रेडिमेडच्या जमान्यात टेलरिंग व्यवसाय डबघाईला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 00:17 IST2021-03-17T20:37:47+5:302021-03-18T00:17:15+5:30

देवगांव : प्रत्येक कुटुंबाला जसा फॅमिली डॉक्टर असतो तसा फॅमिली टेलरही असतो. व्यावसायिकदृष्ट्या डॉक्टरांना चांगले दिवस आले असले, तरी टेलरिंग व्यावसायिक मात्र गेल्या काही वर्षांपासून चिंताग्रस्त बनला आहे. रेडिमेड कपड्यांच्या जमान्यात टेलरिंग व्यवसाय डबघाईला आल्याने पारंपरिक व्यावसायिक विवंचनेत सापडले आहेत.

The tailoring business collapsed in the era of readymade | रेडिमेडच्या जमान्यात टेलरिंग व्यवसाय डबघाईला

रेडिमेडच्या जमान्यात टेलरिंग व्यवसाय डबघाईला

ठळक मुद्देरेडिमेडच्या जमान्यात देखील टेलरिंग व्यवसाय तग धरून होता.

देवगांव : प्रत्येक कुटुंबाला जसा फॅमिली डॉक्टर असतो तसा फॅमिली टेलरही असतो. व्यावसायिकदृष्ट्या डॉक्टरांना चांगले दिवस आले असले, तरी टेलरिंग व्यावसायिक मात्र गेल्या काही वर्षांपासून चिंताग्रस्त बनला आहे. रेडिमेड कपड्यांच्या जमान्यात टेलरिंग व्यवसाय डबघाईला आल्याने पारंपरिक व्यावसायिक विवंचनेत सापडले आहेत.

रेडिमेडच्या जमान्यात देखील टेलरिंग व्यवसाय तग धरून होता. अचूक मापाचे हवेतसे मनपसंद कपडे शिवायची आवड निराळीच होती. तसेच जशी नवी फॅशन येईल त्यानुसार कपडे शिवले जायचे. मात्र आता काळ बदलला आहे. कोरोनामुळे ग्रामीण भागात टेलरिंग व्यवसाय अडचणीत आला आहे. शाळा बंद व लग्नसोहळे कमी यामुळे मोठा हंगाम निघून गेल्याने हा व्यवसाय अक्षरशः डबघाईला आला आहे.

एकेकाळी शिवणकला घराघरात शिकली जायची. मुलींनी शिवणकलेचे शिक्षण घ्यावे, असा त्यांच्या आईवडिलांचा आग्रह असायचा. उपजीविकेचा कोणताच पर्याय नसेल तर शिवणकाम करणाऱ्या मुलीला निदान स्वत:च्या पायावर तरी उभे राहता येईल, अशी अपेक्षा आईवडिलांची असायची. परंतु काळ बदलला आणि सर्वच काही बदलले. आज शिवणकाम शिकणे म्हणजे कमीपणाचे लक्षण वाटू लागल्याने त्याकडे दुर्लक्ष होऊ लागले आहे.

टेलरिंगच्या व्यवसायात आज मराठी माणूस जेमतेम औषधाला सापडेल अशी अवस्था आहे. एकेकाळी शर्ट साडेतीन, तर पँट दहा ते पंधरा रुपयांत शिवून मिळत होती. परंतु, आज तो शर्ट दोनशे ते तीनशे रुपये, तर पँट तीनशे ते साडेचारशे रुपयांना शिवून मिळत आहे. महागाईमुळे शिलाईचे दरही वाढले आहेत. त्यामुळेच गेल्या दहा वर्षांत तयार कपड्याचा व्यवसाय तेजीत आला आहे. परिणामी आज कपडे शिवण्याचा कलही कमी झाला आहे. रेडिमेडचा जमाना असला तरी नेहमीचे ग्राहक जुन्या टेलर मास्टरची गुणवत्ता पाहून त्यांच्याकडे येतात. परंतु ते कधी मिळतील याची तारीख सांगता येत नाही.

रेडिमेड कपड्यांच्या कारखान्यांमध्ये एक शर्ट किंवा पँट शिवण्यासाठी सात ते आठ कामगारांचा हातभार लागत असतो. कॉलरमेकर, कफमेकर, कफ अटेचर आदी वेगवेगळे कामगार असतात. एका मापाचे हजारो शर्ट, पँट ते तयार करीत असतात. परंतु स्पेशल टेलरकडे एक कारागीर पूर्ण शर्ट आणि पँट शिवतो. त्यामुळे फिटिंगच्या बाबतीत कुठेही तक्रार येत नाही. परंतु आता या व्यवसायात फारसा फायदा मिळत नाही. त्यामुळेच काही व्यावसायिकांनी आपले व्यवसाय बंद केले आहेत. तसेच शिवणकला शिकण्यास सहसा कोणी तयार होत नाही. परिणामी कारागीर मिळणेही बंद झाले आहे.

कॅन्हॉस, बटने, अस्तर, सुई, धागा आदी साहित्यांच्या दरात वाढ झाल्याने शिलाईचे दर वाढले आहेत. पूर्वीपासून कपडे शिवून घेणारे ग्राहक नेहमीच्या टेलरकडे येतात. परंतु त्यांची मुले फॅशनेबल रेडिमेड कपडे वापरत असल्यामुळे या व्यवसायावर परिणाम झाला आहे. त्यातच हल्ली विद्यार्थ्यांचा गणवेश ठराविक दुकानातून घेण्याचा आग्रह शाळांनी धरल्यामुळे त्याचा परिणामही टेलरिंग व्यवसायावर झाला आहे.

Web Title: The tailoring business collapsed in the era of readymade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.