उमेदवारी लादल्याने भाजपात रणकंदन
By Admin | Updated: August 7, 2016 00:26 IST2016-08-07T00:26:15+5:302016-08-07T00:26:53+5:30
पदवीधर मतदारसंघ : मंत्र्यांच्या सलगीतून संधी दिल्याचा आरोप

उमेदवारी लादल्याने भाजपात रणकंदन
नाशिक : विभागीय पदवीधर मतदारसंघासाठी भाजपाच्या वतीने सर्व प्रमुख दावेदारांना डावलून डॉ. प्रशांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आल्याने पक्षांतर्गत रणकंदन सुरू झाले आहे. भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी डॉ. पाटील यांच्या स्वागताचे सोहळे सुरू केले असले तरी अंतर्गत धुसफूस सुरू झाली असून, त्याचा निवडणुकीवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. नाशिक विभागीय पदवीधर मतदारसंघ हा कधी काळी भाजपाचा बालेकिल्ला मानला जात होता. (पान ७ वर) मात्र आता मुळातच या मतदारसंघातून वर्चस्व गमावून बसले आहेत. त्यात आता उमेदवारीचा वाद त्रासदायक ठरत आहे. पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी पक्षातून अनेक इच्छुक होते. त्यात याच मतदारसंघाचे माजी आमदार प्रतापदादा सोनवणे, अॅड. नितीन ठाकरे, हेमंत धात्रक, जळगावमधून रोहिणी खडसे, नगरमधून भानुदास बेरड अशी अनेकांची नावे चर्चेत होती. त्यांनी मतदारांची नोंदणी करून जोरदार तयारी करतानाच उमेदवारीसाठी व्यूहरचना सुरू केली होती. मात्र, त्यांना डावलून पक्षाशी थेट संबंध नसलेल्या डॉ. पाटील यांना उमेदवारी देण्यामुळे सारेच इच्छुक हिरमुसले आहेत. सटाणा येथील मूळ रहिवासी असलेले डॉ. पाटील हे आताच केंद्रीय मंत्री झालेल्या डॉ. सुभाष भामरे यांच्याशी असलेले नाते वगळता पक्षाशी कोणतेही नाते नसल्याचा आरोप काहींनी केला आहे. यासंदर्भात सोशल मीडियावरूनही या नाराजीला तोंड फुटलेले दिसून येत आहे. दुसऱ्या पक्षातून भाजपात आलेल्या नेत्याच्या जावयालाच उमेदवारीची बक्षिसी का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.आपतधर्म म्हणून भाजपाचे शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांनी या उमेदवारीबद्दल डॉ. प्रशांत पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले असले तरी त्यांनीच नेमलेल्या शहरातील अन्य पदाधिकाऱ्यांनी मात्र आपली नावे उघड न करण्याच्या अटीवर या उमेदवारीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.