तबलावादनाने रसिक मंत्रमुग्ध
By Admin | Updated: August 26, 2016 23:52 IST2016-08-26T23:51:47+5:302016-08-26T23:52:12+5:30
गुरुपौर्णिमा : पंडित भानुदास पवार यांच्याप्रती भावांजली

तबलावादनाने रसिक मंत्रमुग्ध
नाशिक : गुरुपौर्णिमेनिमित्त ज्येष्ठ तबलावादक कै. पंडित भानुदास पवार यांच्याप्रती भावांजली अर्पण करीत पवार तबला अकादमीच्या विद्यार्थ्यांनी तबलावादनाद्वारे रसिकांना मंत्रमुग्ध केले.
कुसुमाग्रज स्मारक येथे शुक्रवारी सायंकाळी झालेल्या या कार्यक्रमाचा प्रारंभ ज्येष्ठ गायक मकरंद हिंगणे व अकादमीचे अध्यक्ष गिरीश पांडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाला. अकादमीचे संचालक नितीन पवार यांनी प्रास्ताविक केले. यावेळी क्लासतर्फे विद्यार्थ्यांनी सहवादन केले. यश मालपाठक, शुभंकर हिंगणे, मंगेश अपशंकर, प्रणीत तावड, प्रदीप फळसणकर यांनी ताल रुपकमध्ये, आदित्य शिरसाठ, सिद्धेश शिरसाठ, सुखदेव पाटील, विनायक टेकाडे, सौरभ-संदीप जोशी यांनी त्रितालमध्ये, तेजस अभोणकर, दुर्गेश पैठणकर, प्रज्वल दंडगव्हाळ, मुक्ता बलोकर, अथर्व उदावंत, पार्थ शिलेदार यांनी ताल सवारीमध्ये तर शुभम जोशी, राधिका रत्नपारखी, प्रफुल्ल पवार यांनी ताल त्रितालमध्ये सहवादन केले. या विद्यार्थ्यांनी पेशकार-कायदे-रेले, चक्रधार इत्यादि प्रकारातील वादन सादर केले. याशिवाय अकादमीतील विराज, वरद, आयुष पुराणिक यांसह छोट्या गटातील विद्यार्थ्यांनीही तबलावादन सादर केले. ओंकार कुडीलकर याने हार्मोनियमवर लेहरा साथसंगत केली. क्लासमधील ज्येष्ठ विद्यार्थी कल्याण पांडे, सुजित काळे, गौरव तांबे यांच्या एकला तबला वादनाचे श्रोत्यांनी विशेष कौतुक केले. अद्वैत पवार, वेदांत देव तबला, सागर कुलकर्णी गायन, ईश्वरी दसककर सिंथेसायझर, ओंकार कुडीलकर काऊन, गौरव तेजाळे झेंबे, ओंकार पांडे यांनी आॅक्टोपॅडद्वारे फ्युजन म्युझिक सादर करीत रसिकांना एक आगळीच मेजवानी दिली. मंगेश जोशी यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास तबलावादक विद्यार्थी, पालक व रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)