कवितांतून उलगडला ‘संस्कृतीचा सारांश’
By Admin | Updated: March 7, 2016 00:13 IST2016-03-07T00:11:58+5:302016-03-07T00:13:00+5:30
कुसुमाग्रज स्मरण : मराठीतील चार दिग्गज कवींना उजाळा

कवितांतून उलगडला ‘संस्कृतीचा सारांश’
नाशिक : ग. दि. माडगूळकर, बा. भ. बोरकर, मंगेश पाडगावकर आणि कुसुमाग्रज हे चार कवी म्हणजे जणू संगीताची चार घराणीच... या चौघा दिग्गजांच्या कविता-गीतांतून त्यांच्या कवितांचे अनेकविध पदर उलगडले गेले अन् रसिकांना ‘संस्कृतीचा सारांश’ही उमजून गेला...
कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित ‘कुसुमाग्रज स्मरण’ उपक्रमात आज सायंकाळी कुसुमाग्रज स्मारकात ‘संस्कृतीचा सारांश’ हा कार्यक्रम रंगला. माडगूळकर, बोरकर, पाडगावकर व कुसुमाग्रज या चारही कवींच्या कवितांतून उत्कटपणे व्यक्त झालेल्या निसर्ग, समाज, माणूस आणि प्रीती या बाबी कार्यक्रमातून अलवारपणे उलगडल्या. त्या-त्या कवीचे बालपण, त्यांचा कवितेचा प्रवास तसेच या चार कवींवर एकमेकांचा पडलेला
प्रभाव रंजकतेने मांडण्यात
आला.
माडगूळकर यांच्या अल्लड माझी प्रीत, आज सुगंधित झाले जीवन, बोरकर यांच्या प्रीतीची वाट, हळद लावुनी आले ऊन, पाडगावकर यांच्या छोरी, पंख असूनही, कुसुमाग्रजांच्या प्रेमयोग, प्रेम कर भिल्लासारखं आदि कवितांचे वाचन पंकज व अपर्णा क्षेमकल्याणी यांनी केले, तर गायक करण शिंदे यांनी दहा ठिकाणी विरली, पत्र म्हणजे कागदाचा एक तुकडा, नेहा मूर्ती यांनी सरीवर सरी, पाऊस कोसळे हा, रजिंदर कौर यांनी कोन्यात झोपली सतार, माझ्या मातीचे गायन ही सुरेल गाणी सादर केली. त्यांना रागेश्री धुमाळ (संवादिनी), आनंद शहाणे (तबला) यांनी संगीतसाथ केली. कार्यक्रमाची संकल्पना दिलीप साळवेकर यांची, तर संहिता अपर्णा क्षेमकल्याणी यांची होती. मार्गदर्शन रागिणी कामतीकर यांचे
होते.
यावेळी काही ध्वनिफितीही ऐकवण्यात आल्या. आमदार हेमंत टकले, अॅड. विलास लोणारी, लोकेश शेवडे, प्रा. मकरंद हिंगणे, अरविंद ओढेकर, डॉ. यशवंत बर्वे यांनी कलावंतांचा सत्कार केला. श्याम पाडेकर यांनी सूत्रसंचालन केले. रसिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)