संवादासाठी सहानुभूतीची आवश्यकता
By Admin | Updated: July 22, 2015 01:01 IST2015-07-22T00:56:08+5:302015-07-22T01:01:39+5:30
जयप्रकाश काबरा : रामनाथशेठ स्मृती व्याख्यानमाला

संवादासाठी सहानुभूतीची आवश्यकता
नाशिक : भाषा हे संवादाचे महत्त्वाचे साधन आहे. विचार आणि आयडियांची देवाण-घेवाण केल्याने ज्ञानात वाढ होते. नेहमी संवाद साधण्याचा प्रयत्न करायला हवा, असे मत जयप्रकाश काबरा यांनी संस्कृती वैभव आयोजित रामनाथशेठ स्मृती व्याख्यानमालेत व्यक्त केले.
काबरा यांनी आपल्या व्याख्यानाची सुरुवात मंगेश पाडगावकर यांच्या ‘सांगा कसं जगायचं’ या कवितेने केली. यावेळी जयप्रकाश काबरा यांनी वेगवेगळी उदाहरणे देत संवादाचे महत्त्व अधोरखित केले. माणसाने दु:खाचा बाजार कधीच न मांडता जन्मभूमीपेक्षा कर्मभूमीला महत्त्व देणे आवश्यक असल्याचे नमूद केले. संवाद बोलून आणि न बोलूनही साधता येतो, असे सांगत आपला चेहरा १४४ प्रकारच्या भावना व्यक्त करत असतो, असे सांगितले. यावेळी पुढे बोलताना काबरा म्हणाले की, भावना योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने व्यक्त करणे आवश्यक असल्याचे सांगत व्यक्त न होण्यामुळे हृदयविकाराच्या घटना बळावत असल्याचे ठळकपणे सांगितले.
‘सुसंवादातून आत्मविकास’ हा विषय उलगडून सांगताना काबरा यांनी चार्ली चॅपलीन, आर. के. लक्ष्मण यांच्या अंगी असलेल्या कलेचा उपयोग संवाद साधताना कसा होतो हे उलगडून सांगितले. संवाद म्हणजे केवळ बोलणे नाही तर लक्षपूर्वक ऐकणे आणि ते आत्मसात करणे होय. आईनेदेखील आपल्या पाल्याचे म्हणणे नीट ऐकून त्याला योग्य मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. संवाद साधताना अनुभूती नाही, तर सहानुभूतीची आवश्यकता असल्याचे नेहमी लक्षात ठेवायला हवे, असा सल्ला उपस्थिताना दिला.
व्याख्यानाच्या सुरुवातीला अतुल चांडक यांनी रामनाथशेठ यांचा जीवनपट उलगडून सांगताना जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी व्यासपीठावर संस्कृती वैभवचे अध्यक्ष नंदन दीक्षित, उपाध्यक्ष पी. एस. कुलकर्णी, अरविंद पाठक, रवींद्र देवधर यांच्यासह स्व. रामनाथशेठ चांडक यांचे नातू अतुल चांडक आणि दीपक चांडक आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नंदन दीक्षित यांनी केले, तर सूत्रसंचालन सुप्रिया देवघरे यांनी केले. (प्रतिनिधी)