बाजार समित्यांचा लाक्षणिक बंद
By Admin | Updated: July 4, 2016 22:46 IST2016-07-04T22:41:41+5:302016-07-04T22:46:45+5:30
शासन निर्णयाला विरोध : २० कोटींची उलाढाल ठप्प

बाजार समित्यांचा लाक्षणिक बंद
लासलगाव : शासनाच्या फळे व भाजीपाला नियमन मुक्तीच्या धोरणाविरोधात कांद्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या लासलगावसह जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत, नाशिक, उमराणे, दिंडोरी, सिन्नर, येवला, चांदवड, नांदगाव, मनमाड, देवळा, सटाणा, नामपूर, कळवण, ताहाराबाद, नांदगाव व इगतपुरी तालुका बाजार समित्यांमध्ये एक दिवसाचा लाक्षणिक बंद पाळण्यात आला. या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मात्र बंदमुळे २० कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले.
कोणतीही पर्यायी नियंत्रण यंत्रणा नसताना व शेतकरी हिताचे गाजर दाखवून राज्य शासनाने फळे व भाजीपाला नियमन मुक्त
करण्याचा निर्णयाचे परस्परविरोधी पडसादची दाट शक्यता नाशिक जिल्ह्यातील प्रामुख्याने कांदा व त्यानंतर भाजीपाला व्यवहारात कामकाज करणाऱ्या १७, तर महाराष्ट्रातील कार्यरत ३०५ बाजार समितीच्या व्यवहारात कमालीचे बदल घडण्याची शक्यता आहे.
नाशिक जिल्ह्यातील सतरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सध्या दोन लाख क्विंटल कांदा विक्रीला येत आहे. सोमवारी या शासनाच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समितींचे व्यवहार बंद
राहिले. त्यामुळे सोमवारी वीस कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे मिळणारे दोन लाख रुपये बाजार फीचे उत्पन्न बुडाले. (वार्ताहर)