स्वाइन फ्लूसदृश तिघांचा मृत्यू
By Admin | Updated: April 20, 2015 00:31 IST2015-04-20T00:22:44+5:302015-04-20T00:31:37+5:30
तीन दिवसांतील घटना : आरोग्य यंत्रणेने सतर्क होण्याची गरज

स्वाइन फ्लूसदृश तिघांचा मृत्यू
सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागात स्वाइन फ्लूसदृश आजाराने तीन दिवसांत तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यात एका महिलेचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेने सतर्क होण्याची गरज निर्माण झाली आहे.
मूळ शहा येथील व कल्याण येथे नोकरीला असलेले नवनाथ रामनाथ जाधव (४५) यांना तीन दिवसांपूर्वी नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. रविवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यात स्वाइन फ्लूची लक्षणे आढळून आली होती.
पाथरे येथील जगन्नाथ सुकदेव डुंबरे (५५) यांना चार दिवसांपूर्वी पोहेगाव व त्यानंतर कोपरगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. प्रकृती खालावल्याने त्यांना नाशिक येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले होते. डुंबरे यांच्यातही स्वाइन फ्लूसदृश आजाराची लक्षणे आढळून आली होती. शनिवारी सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. पाथरे येथे शनिवारी रात्री उशिरा त्यांच्यावर ैअंत्यसंस्कार करण्यात आले. खबरदारीसाठी डुंबरे यांच्या कुटुंबीयांना स्वाइन फ्लू प्रतिबंधक औषधे देण्यात आली आहेत.
दरम्यान, तीन दिवसांपूर्वी फर्दापूर येथील रानडे नामक महिलेचाही स्वाइन फ्लूसदृश आजाराने मृत्यू झाला. रानडे यांनाही स्वाइन फ्लूसदृश आजाराची लक्षणे आढळून आल्याने नाशिकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिघांचाही स्वाइन फ्लूसदृश आजाराने मृत्यू झाला असला, तरी याबाबतचा अहवाल शासकीय आरोग्य यंत्रणेला प्राप्त झाला नसल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. आर. त्र्यंबके यांनी दिली. खासगी रुग्णालयातून त्यांच्या स्वाइन फ्लू सदृश आजाराला पुष्टी जोडली जात असली तरी त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल. (वार्ताहर)