स्वाइन फ्लू रुग्णांना मिळणार भरपाई
By Admin | Updated: March 29, 2015 00:45 IST2015-03-29T00:37:38+5:302015-03-29T00:45:49+5:30
शासनाची समिती स्थापन : लवकरच होणार कार्यवाही

स्वाइन फ्लू रुग्णांना मिळणार भरपाई
नाशिक : स्वाइन फ्लूच्या रुग्णांवर मोफत उपचार करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतल्यानंतर आता या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरावर समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे आता अनेक रुग्णांच्या उपचारासाठी झालेला खर्च परत मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राज्यात स्वाइन फ्लूने डोके वर काढले आणि अनेक ठिकाणी रुग्णांचे मृत्यू झाले. नाशिक शहरासह जिल्ह्यातही स्वाइन फ्लूची लागण मोठ्या प्रमाणात झाली. त्याची दखल घेऊन राज्यशासनाने वैद्यकीय उपाययोजना राबविल्या शिवाय स्वाइन फ्लू झालेल्या रुग्णांवर मोफत उपचार करण्याची घोषणा करण्यात आली. शासकीय रुग्णालयात तर जवळपास मोफत उपचार होतच असतात; परंतु खासगी रुग्णालयातदेखील मोठ्या प्रमाणात खर्च येत असल्याने शासनाने खासगी रुग्णालयांतदेखील मोफत उपचार करण्यात येतील, अशी घोषणा करण्यात आली. आता या घोषणेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून, रुग्णांचा अशाप्रकारे झालेला खर्च परत देण्यासाठी शासनाने समिती नियुक्त केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत जिल्हा शल्यचिकित्सक आणि अन्य मान्यवरांचा समावेश आहे, अशी माहिती महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बी. आर. गायकवाड यांनी दिली.
दरम्यान, नाशिक शहरात आत्तापर्यंत १९ जणांचा मृत्यू झाल्याची माहितीही गायकवाड यांनी दिली. सध्या महापालिकेच्या रुग्णालयात केवळ दोन रुग्ण उपचार घेत असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या १ जानेवारीपासून २७ मार्चपर्यंत दोन हजार ४९७ रुग्णांचे स्क्रिनिंग करण्यात आले. त्यापैकी १ हजार ११३ रुग्णांवर उपचार करण्यात आले. रुग्णांचे स्वॅब प्रयोगशाळेत पाठविल्यानंतर आत्तापर्यंत ९३ जणांना स्वाइन फ्लू झाल्याचे आढळले आहे, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)