आंदोलनकर्त्यास स्वाइन फ्लू
By Admin | Updated: March 16, 2015 00:47 IST2015-03-16T00:46:52+5:302015-03-16T00:47:16+5:30
बिऱ्हाड आंदोलन : काळजी घेण्याबाबत डॉक्टरांचे आवाहन

आंदोलनकर्त्यास स्वाइन फ्लू
नाशिक : येथील आदिवासी विकास कार्यालयासमोर सुरू असलेल्या बिऱ्हाड आंदोलनातील एका आंदोलनकर्त्याला स्वाइन फ्लू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, सदर कार्यकर्त्याची प्रकृती बिघडल्यानंतर त्यास उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याची लक्षणे स्वाइन फ्लूची वाटल्याने त्यास तातडीने दाखल करून घेण्यात आले. वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच आजाराचे खरे कारण निश्चित होणार आहे.
जिल्ह्यात स्वाइन फ्लू आजाराने डोके वर काढले असून, आत्तापर्यत अनेकांचा यामुळे मृत्यू झालेला आहे. जिल्हा रुग्णालयात सध्या स्वाइन फ्लूचे पाच संशयित रुग्ण दाखल आहेत. त्यातील एकास कालच घरी पाठविण्यात आले होते, तर आज आंदोलनकर्ता कार्यकर्ता रुग्ण दाखल झाला आहे. आदिवासी विकास कार्यालयासमोर गेल्या कित्येक दिवसांपासून बिऱ्हाड आंदोलन सुरू आहे. यातील अनेकांची प्रकृती खालावल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे.
आज गिनबा तडवी (४६) या आंदोलनकर्त्याला प्रकृती अस्वास्थ्यामुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याला डॉक्टरांनी तपासले असता, त्याच्यात स्वाइन फ्लूची लक्षणे आढळून आल्याने त्यास तातडीने स्वाइन फ्लू कक्षात दाखल करून घेण्यात आले.
दरम्यान, आंदोलनकर्त्यांमधील अनेकांची प्रकृती खालावली असून आंदोलनकर्त्यांनी काळजी घ्यावी, स्वाइन फ्लू पसरणार नाही याबाबतची दक्षता घेतली पाहिजे, असे जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले. (प्रतिनिधी)