जलतरण तलाव २ आॅगस्टपासून खुले

By Admin | Updated: July 16, 2016 00:19 IST2016-07-16T00:11:32+5:302016-07-16T00:19:25+5:30

महापौरांचा निर्णय : सद्य:स्थितीत सकाळच्या सत्राला परवानगी

Swimming pool open from 2nd August | जलतरण तलाव २ आॅगस्टपासून खुले

जलतरण तलाव २ आॅगस्टपासून खुले

 नाशिक : गंगापूर धरणातील पाणीसाठा ६६ टक्क्यांवर जाऊन पोहोचल्याने महापालिकेने चार महिन्यांपासून पूर्णवेळ बंद ठेवलेले जलतरण तलाव २ आॅगस्टपासून खुले करण्याचा निर्णय घेतला असून तशी घोषणा महापौर अशोक मुर्तडक यांनी शुक्रवारी केली. सद्य:स्थितीत सकाळच्या सत्रालाच परवानगी देण्यात आली असून, पाणीस्थितीचा आढावा घेऊन नंतर पूर्णवेळ जलतरण तलाव खुले करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे महापौरांनी स्पष्ट केले.
शहरात पाणीकपात सुरू असतानाच राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या सूचनेनुसार महापालिकेने आपले पाचही जलतरण तलाव दि. २१ मार्चपासून बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. महापालिकेने नाशिक पश्चिम विभागातील वीर सावरकर तरण तलाव, नाशिकरोड येथील राजमाता जिजाऊ आंतरराष्ट्रीय तरण तलाव, सिडकोतील स्वामी विवेकानंद तरण तलाव, सातपूर येथील क्लब हाउसमधील तरण तलाव आणि पंचवटीतील श्रीकांत ठाकरे तरण तलाव पूर्ण वेळ बंद ठेवले होते. महापालिकेने ९ आॅक्टोबर २०१५ पासून शहरात एकवेळ पाणीपुरवठ्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली, त्याचवेळी मनपाच्या पाचही तरण तलावातील सायंकाळचे सत्र बंद करण्यात आले होते. केवळ सकाळचे तीन सत्र चालविले जात होते. त्यानंतर २२ फेबु्रवारीपासून विभागवार जलशुद्धीकरणनिहाय आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय झाल्याने दर सोमवारी साप्ताहिक सुटीसह दोन दिवस तरणतलाव बंद ठेवण्यात येत होता. मात्र, धरणातील पाणीसाठ्यात होत चाललेली घट लक्षात घेता पूर्णवेळ तरण तलाव बंद ठेवण्याच्या सूचना जलसंपदामंत्र्यांनी केल्या होत्या.
गेल्या चार महिन्यांपासून त्याची अंमलबजावणी सुरू होती. सदर तरण तलाव बंद ठेवण्यात आल्याने प्रतिदिन सुमारे सव्वा लाख लिटर्स पाण्याची बचत झाल्याचा दावा महापालिकेने केला. आता गंगापूर धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाल्याने महापौरांनी दर गुरुवारी होणारी पाणीकपात रद्द केली असून त्यापाठोपाठ जलतरण तलावही २ आॅगस्टपासून खुले करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Swimming pool open from 2nd August