स्विफ्टच्या धडकेत दुचाकीवरील मुलीचा मृत्यू
By Admin | Updated: April 11, 2017 20:55 IST2017-04-11T20:55:29+5:302017-04-11T20:55:29+5:30
भरधाव स्विफ्ट कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत जखमी झालेल्या तिघांपैकी तेरा वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना

स्विफ्टच्या धडकेत दुचाकीवरील मुलीचा मृत्यू
नाशिक : भरधाव स्विफ्ट कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत जखमी झालेल्या तिघांपैकी तेरा वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (दि़१०) रात्रीच्या सुमारास मुंबई-आग्रा महामार्गावरील आडगाव शिवारातील सर्व्हिस रोडवर घडली़ निर्जला प्रमोद गोसावी (१३, म्हाडा कॉलनी) असे अपघातात मृत झालेल्या मुलीचे नाव आहे़
आडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हाडा कॉलनीतील रहिवासी प्रमोद वसंत गोसावी हे रात्री नऊ वाजेच्या सुमारास पत्नी व मुलगी निर्जलासह प्लेझर दुचाकीवरून (एमएच १५, डीवाय ०९५६) पेशवा हॉटेलसमोरील सर्व्हिस रोडने जात होते़ यावेळी भरधाव आलेल्या स्विफ्ट कारने (एमएच १४, सी एच ९०९७) त्यांच्या दुचाकीला धडक दिली़ या अपघातात निर्जलाच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाला, तर तिचे वडील प्रमोद गोसावी व आई किरकोळ जखमी झाली़
याप्रकरणी आडगाव पोलिसांनी कारचालक अशोक नामदेव खैरनार (रा़ साकूर मांडवा, ता़ संगमनेर, जि़ अहमदनगर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे़