ऐन श्रावणात सणासुदीचा गोडवा कमी झाला; साखर महाग !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:17 IST2021-08-13T04:17:46+5:302021-08-13T04:17:46+5:30
नाशिक : श्रावण सुरू झाल्यामुळे साखरेची मागणी वाढते. मात्र, साखरेच्या दरात वाढ झाल्याने ग्राहकांना याचा फटका बसणार असून सणासुदीच्या ...

ऐन श्रावणात सणासुदीचा गोडवा कमी झाला; साखर महाग !
नाशिक : श्रावण सुरू झाल्यामुळे साखरेची मागणी वाढते. मात्र, साखरेच्या दरात वाढ झाल्याने ग्राहकांना याचा फटका बसणार असून सणासुदीच्या काळात साखर महागल्याने स्वयंपाक घरातील गोड पदार्थांचे प्रमाण घटल्याने ऐन श्रावणात सणासुदीचा गोडवा कमी झाला आहे.
साखर प्रत्येक घराच्या स्वयंपाक घरातील मुख्य घटक असून कोणत्याही आनंदाच्या क्षणी, शुभप्रसंगी कुटुंबीयांसह गोड पदार्थांचा आस्वाद घेण्याची भारतीय संस्कृती आहे. परंतु, यावर्षी ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेचे भाव वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना आपल्या खर्चात कपात करावी लागत असून गोड पदार्थांच्या आवडीलाही मुरड घालावी लागत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात ब्राझिलमधून मोठ्या प्रमाणात साखरेची आवक होते. परंतु, यावर्षी साखरेचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करणाऱ्या ब्राझिलसारख्या राष्ट्रात दुष्काळ असल्याने त्याचा थेट परिणाम साखरेच्या उत्पादनावर झाला असून आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यापाऱ्यांनी त्यांचा मोर्चा आता भारताकडे वळविला आहे. साखरेला आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी वाढल्यामुळे भारतातही साखरेचे भाव वाढू लागले आहेत.
---
जिल्ह्याला दररोज लागते साखर (क्विंटलमध्ये) - ३४७० क्विंटल
श्रावणात मागणी वाढली
श्रावणात नागपंचमी, नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन, श्री कृष्ण जन्माष्टमी तसेच गोपालकाला यासारखे वेगवेगळे सण येतात. यासोबतच सोमवार व शनिवारीही अनेक भाविक गोड पदार्थांचे नैवद्य करतात. परिणामी साखरेच्या मागणीत प्रमाणात भाव वाढ झाली आहे.
साखरेचे दर (प्रति किलो)
जानेवारी - ३४.५०
फेब्रुवारी - ३४.५०
मार्च - ३४
एप्रिल -३४.५०
मे - ३४
जून - ३४
जुलै - ३५
ऑगस्ट - ३६
का वाढले भाव
आंतरराष्ट्रीय बाजारात ब्राझिलमधून मोठ्या प्रमाणात साखरेची आवक होते. परंतु ब्राझिलमधील दुष्काळामुळे साखरेचे उत्पादन घटले असून आंतरराष्ट्रीय बाजारातील ग्राहक आता भारताकडे वळल्याने साखरेचे दर काही प्रमाणात वाढले आहेत. भविष्यातही आणखी दरवाढ होण्याची शक्यता असल्याची माहिती साखरेचे व्यापारी राकेश भंडारी यांनी दिली आहे.
महिन्याचे बजेट वाढले
सध्या श्रावण सुरू झाला असून श्रावणापासून सणासुदीचा काळ सुरू होतो. त्यामुळे साखरेच्या पदार्थांचे प्रमाणही वाढत असल्याने साखरेचा वापर वाढला आहे. परंतु, साखरेचे भाव वाढल्यामुळे स्वयंपाक घराचे बजेटही बिघडले आहे.
- अंजली पवार, गृहिणी.
दिवसेंदिवस महागाई वाढत असताना त्यात आता साखरेचीही भर पडली आहे. त्यामुळे स्वयंपाक घरातील आर्थिक बजेटवर त्याचा परिणाम होत असून सणासुदीतही साखर जपून वापरावी लागत असल्याने गोड पदार्थ कमी प्रमाणात करावे लागत आहे.
- पूजा साळवी, गृहिणी