गोड बेदाणा यंदा होणार कडू उत्पादक
By Admin | Updated: April 20, 2015 00:30 IST2015-04-20T00:24:54+5:302015-04-20T00:30:26+5:30
हवालदिल : निफाड तालुक्यातील तीन हजार टन बेदाण्याचे नुकसान

गोड बेदाणा यंदा होणार कडू उत्पादक
कसबे सुकेणे - अवेळी पावसामुळे द्राक्षांपासून बनविण्यात येणारा बेदाणा प्रत्येकवेळी भिजल्याने यंदा बेदाण्याचे उत्पादन निम्म्याने घटणार असून, उत्पादन खर्च वाढत आहे. बेदाण्याचे बाजारभाव सुधारत नसल्याने उत्पादक हैराण झाले आहेत. यंदा गोड द्राक्षांच्या बेदाण्याचा व्यवसाय कडू झाला आहे.
निफाड तालुक्यात पिंपळगाव बसवंत, कसबे सुकेणे, उगांव, ओझर याभागांत मोठ्या प्रमाणावर बेदाण्याची निर्मिती करण्यात येते. तीन वर्षांपासून बेदाण्याच्या व्यवसायाला मोठी घरघर लागली आहे. द्राक्षमण्यांचे बाजारभाव वाढत असताना बेदाण्याचे बाजारभाव तीन वर्षांपासून स्थिर राहिले आहेत. त्यामुळे सलग तीन वर्षांपासून बेदाणा व्यावसायिकांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत असल्याचे बेदाणा व्यावसायिकांनी सांगितले.
सध्या पिवळा सल्फर बेदाण्याला ७५ ते ९० रुपये प्रतिकिलो, तर सांगली हिरवा डिपिंग आॅईल बेदाण्यास १८० रुपयांपर्यंत बाजारभाव असल्याचे बेदाणा व्यावसायिक ांनी सांगितले.
उत्पादन खर्चात वाढ
बेदाण्याच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली असून, दहा गल्ल्यांच्या शेडला १२ लाख रुपये खर्च येतो. याशिवाय द्राक्षमण्यांची १० ते १५ रुपये अशा चढ्या दराने खरेदी केली तर मजुरी, वाहतूक, बांबू, नेट यांच्या दरात यंदा मोठी वाढ झाल्याने बेदाणा व्यावसायिकांची यंदाही आर्थिक गणिते बदलली आहे.
निर्यातही कमी
पिंपळगाव बसवंत, कसबे सुकेणे, उगाव, दिंडोरी, साकोरे, खेडगाव या भागांतील बेदाणा मलेशिया, पाकिस्तान, बांगलादेश, दुबई या देशांत निर्यात केला जातो. यंदा बाहेरच्या देशातूनही मागणी कमी झाल्याने बाजारभाव सुधारत नसल्याचेही व्यावसायिकांनी सांगितले. सातत्याने तोटा सहन करावा लागत असल्याने यंदाच्या हंगामात २५ टक्क्यांहून अधिक उत्पादकांनी बेदाण्याचे उत्पादन घेतले नसल्याची माहिती समोर आली आहे. जर बाजारभाव व बेदाणा व्यवसायाची घरघर अशीच कायम राहिली, तर आगामी हंगामात बेदाणा व्यावसायिक बेदाण्याचे उत्पादन घेणार नसल्याचे समजते.
लाखोंची गुंतवणूक धोक्यात
अवेळी पाऊस व गारपिटीमुळे तालुक्यातील बेदाणा शेडचे प्रचंड नुकसान झाले. बेदाणा व्यवसायात लाखोंची गुंतवणूक निफाड व दिंडोरी तालुक्यातून झाली आहे. शासनाचे धोरण, कर्जात न मिळणारी सवलत व वाढता उत्पादन खर्च यामुळे बेदाणा व्यवसाय धोक्यात आल्याने उत्पादक धास्तावले आहे. शासनाने याविषयी मध्यस्थी करून धोरण अवलंबून बेदाणा व्यवसायाचे पुनर्वसन करून सबसिडी द्यावी, अशी मागणी अंबादास दिघे, भूषण धनवटे, राजेंद्र थेटे, के दू गवळी, राजू पठाण, संजय शेवकर, इक्बाल कुरेशी, रफिक मणियार, प्रकाश शेवकर या व्यावसायिकांकडून होत आहे.