येवला : स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तालुकाध्यक्ष महेंद्र पगारे यांच्या नेतृत्वाखाली शहरात इंधन दरवाढीच्या निषेधार्थ जोरदार निदर्शने करत भीक मांगो आंदोलन करण्यात आले. विंचुर चौफुलीवरील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ दुपारी २ वाजता स्वारिपचे कार्यकर्ते जमा झाले. तालुकाध्यक्ष महेंद्र पगारे याच्या हस्ते डॉ.आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत केंद्र व राज्य सरकारचाही निषेध केला. त्यानंतर, निषेधाचे फलक, झेंडे घेऊन भीक मांगो आंदोलन सुरू केले. यात परिसरातून सुमारे ७६५ रुपये जमा झाले. सदर रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी सरचिटणीस बाळासाहेब आहिरे, महिला आघाडीच्या ॲड.स्मिता झाल्टे, कोषाध्यक्ष महेंद्र खळे यांचीही भाषणे झाली. आंदोलनकर्त्यांच्या वतीने निवासी नायब तहसीलदार प्रकाश बुरूगळे यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनात विजय घोडेराव, विनोद त्रिभुवन, विजय पगारे, समाधान गुंजाळ, आकाश घोडेराव, वसंत घोडेराव, महेंद्र खळे, संदीप भालेराव, रोहन रणधीर, बाळासाहेब सोनवणे आदींसह कार्यकर्ते सहभागी होते....या आहेत मागण्या!पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढ कमी करा, रेशन कार्डवर निकृष्ठ दर्जाचे धान्य देण्याऐवजी ५० रुपये किलोने गोडतेल तर १५ रुपये किलोने साखर द्या, कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबाला राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य योजनेंतर्गत २० हजार रुपयांची मदत तातडीने द्या, ज्या महिला कोरोना महामारीने विधवा झाल्या, त्यांना मासिक वेतन चालू करा, खासगी शाळेत चाललेली सक्तीची फी वसुली तत्काळ थांबवा आदी मागण्या करण्यात आल्या.
येवल्यात स्वारिपचे भीक मांगो आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 00:34 IST
स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तालुकाध्यक्ष महेंद्र पगारे यांच्या नेतृत्वाखाली शहरात इंधन दरवाढीच्या निषेधार्थ जोरदार निदर्शने करत भीक मांगो आंदोलन करण्यात आले.
येवल्यात स्वारिपचे भीक मांगो आंदोलन
ठळक मुद्देइंधन दरवाढ निषेध : रक्कम मुख्यमंत्री निधीस