एकावेळी एकच कार्ड होणार स्वॅप
By Admin | Updated: November 16, 2016 22:43 IST2016-11-16T22:38:18+5:302016-11-16T22:43:22+5:30
ग्राहकांची कोंडी : बॅँकांकडून अनेकविध उपाययोजना

एकावेळी एकच कार्ड होणार स्वॅप
नाशिक : जर तुमच्या खिशात अनेक बॅँकांचे एटीएम कार्ड असतील आणि तुम्ही प्रत्येक कार्डाचा वापर करून एटीएममधून रक्कम काढण्याचा विचार करीत असाल तर, जरा थांबा. कारण तुमच्याकडे कितीही कार्ड असले तरी तुम्हाला वापर मात्र कोणत्याही एकाच कार्डाचा करता येणार आहे.
मोदींच्या घोषणेनंतर बॅँका आणि एटीएम बाहेर ग्राहकांच्या रांगा लागत आहेत. पैसे काढण्याची मर्यादा मर्यादित असल्यामुळे पैसे मिळविण्यासाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. या परिस्थितीत रांगेतील जास्तीत जास्त ग्राहकाला पैसे अदा व्हावेत यासाठी पैसे काढण्यावर मर्यादा आणली आहे. त्याचाच एक भाग म्हणून ग्राहकांकडे कितीही एटीएम कार्ड असले तरी त्यांना एकावेळी एकच कार्ड वापरता येणार आहे. दुसरे कार्ड वापरल्यास ते कार्यरत होणार नसल्याची व्यवस्था मशीनमध्ये करण्यात आलेली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजार आणि पाचशेची नोट चलनातून रद्द केल्यानंतर ग्राहकांनी त्याच रात्री एटीएममध्ये जाऊन तीन वेळा ४०० याप्रमाणे १२०० रुपये काढून ५०० आणि १००० ची नोट एटीएम मशीनमधून येणार नाही याची काळजी घेतली. अनेकांनी त्यांच्याजवळील कार्डाचा वापर करीत जास्तीत जास्त रक्कम काढली. यामुळे एटीएममध्ये बराच वेळ लागण्याबरोबरच इतरांनाही ताटकळत उभे रहावे लागते. ही बाब लक्षात घेऊन रिझर्व्ह बॅँकेच्या सूचनेनुसार आता एकावेळी एकच कार्ड एटीएममधून स्वॅप करता येणार आहे. त्यामुळे इतर ग्राहकांना पैसे काढता येण्यासाठी वेळ मिळणार आहे. (प्रतिनिधी)