घुमला विक्रमी समूहस्वर

By Admin | Updated: January 25, 2016 22:59 IST2016-01-25T22:56:37+5:302016-01-25T22:59:23+5:30

घुमला विक्रमी समूहस्वर

Swamy Vikrammi Samskarasar | घुमला विक्रमी समूहस्वर

घुमला विक्रमी समूहस्वर

नाशिक : अकरा हजार चिमुकल्यांच्या मुखातून ‘विजयी विश्व तिरंगा प्यारा’ हे शब्द उमटले अन् सर्वच उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. शहरातील २७ शाळांमधील तब्बल अकरा हजार विद्यार्थ्यांनी एकाच वेळी आज प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशभक्तिपर गीतांचे गायन करीत विक्रम नोंदवला.
झेप सामाजिक, सांस्कृतिक संस्थेच्या वतीने पंचवटीतील आर. पी. विद्यालयाच्या प्रांगणात हा दिमाखदार सोहळा पार पडला. गेल्या महिनाभरापासून या उपक्रमाची तयारी सुरू होती. भारताचे माजी लष्करप्रमुख जनरल जोगिंदर जसवंत सिंह यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. आमदार निर्मला गावित, जयंत जाधव, महापौर अशोक मुर्तडक, महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन, माजी आमदार माणिकराव कोकाटे आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते.
ज्येष्ठ संगीतकार श्रीकृष्ण चंद्रात्रे यांनी या उपक्रमाचे संचालन केले. भारताच्या मूळ राष्ट्रगीतातील प्रचलित नसलेली चार कडवी त्यांच्या चमूने सादर केली. त्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली तिरंगी टोप्या परिधान करणाऱ्या अकरा हजार विद्यार्थ्यांनी एकाच वेळी एका सुरात ‘विजयी विश्व तिरंगा प्यारा’, ‘सारे जहॉँ से अच्छा’, ‘या भारतात बंधुभाव नित्य वसू दे’ आणि ‘भारत हमें प्यारा हैं’ या चार गीतांचे गायन करीत आगळा विक्रम नोंदवला. त्याला सर्वच उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. सुहास खरे, राजन अग्रवाल (ढोलकी), हृषीकेश क्षीरसागर (तबला) व ज्ञानेश्वर कासार (संवादिनी) यांनी साथसंगत केली.
दरम्यान, समूहगान झाल्यानंतर लगेचच ‘वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडिया’ या संस्थेचे दिनेश पैठणकर यांनी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा उपमहापौर गुरुमित बग्गा यांना विक्रम नोंदवल्याचे प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह प्रदान केले. प्रारंभी बग्गा यांनी उपक्रमाचा उद्देश समजावून सांगितला. बालवयातच मुलांच्या मनावर देशभक्तीचे संस्कार केल्यास त्यातून उत्तम नागरिक निर्माण होतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. विरोधी पक्षनेत्या कविता कर्डक, शिक्षण सभापती संजय चव्हाण, नगरसेवक राहुल ढिकले, समाधान जाधव, विमल पाटील, रुची कुंभारकर, उद्धव निमसे, दामोदर मानकर आदिंसह पालक उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Swamy Vikrammi Samskarasar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.