सत्तेसाठी गहाण ठेवला ‘स्वाभिमान’
By Admin | Updated: July 1, 2017 01:22 IST2017-07-01T01:21:42+5:302017-07-01T01:22:12+5:30
नाशिक : राज्यभरात शेतकऱ्यांनी कर्जमुक्तीसाठी केलेल्या आंदोलनानंतर सरकारने घेतलेला कर्जमाफीचा निर्णय शेतकऱ्यांची दिशाभूल करणारा असून, यामुळे शेतकरी कदापि कर्जमुक्त होणार नाही.

सत्तेसाठी गहाण ठेवला ‘स्वाभिमान’
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : राज्यभरात शेतकऱ्यांनी कर्जमुक्तीसाठी केलेल्या आंदोलनानंतर सरकारने घेतलेला कर्जमाफीचा निर्णय शेतकऱ्यांची दिशाभूल करणारा असून, यामुळे शेतकरी कदापि कर्जमुक्त होणार नाही. त्यामुळे शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेने सरकारच्या निर्णयाचा निषेध केला आहे. तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी त्यांचा स्वाभिमान गहाण ठेवला असून, एकीकडे त्यांचे प्रतिनिधी सरकारमध्ये असताना दुसरीकडे राजू शेट्टी शेतकऱ्यांचा कळवळा असल्याचा आव आणत असल्याची बोचरी टीका शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. सूकाणू समितीलाही संघटनेने टीकेचे लक्ष्य करीत समितीच्या सदस्यांच्या राजकीय श्रेयवादाच्या लढाईत शेतकऱ्यांच्या मूळ प्रशांकडेच दुर्लक्ष झाल्याचा आरोप शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेने शुक्रवारी (दि.३०) केला आहे.
नाशिक येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित शेतकरी संघनेच्या राज्यस्तरीय बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन संघटनेची कर्जमाफीविषयी भूमिका स्पष्ट केली. यावेळी शेतकरी नेते शंकर धोंडगे म्हणाले, एकीकडे सरकारने फसव्या स्वरूपाच्या कर्जमाफीची घोषणा करून शेतकऱ्यांचे आंदोलन संपविण्याचा प्रयत्न केला, तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या मागण्या मांडणाऱ्या समन्वय समितीत राजकीय हेतूने प्रेरित लोकांची घुसखोरी दिसून आल्यानंतरही सुकाणू समितीत शेतकऱ्यांपेक्षा कामगारांच्या नेत्यांचाच अधिक भरणा असल्याचे दिसून आले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले, शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी आखडते हात घेणाऱ्या सरकारच्या हस्तक्षेपामुळेच शेतीमालेचे भाव कोसळून शेतकरी कर्जबाजारी झाला असून, सरकाने कर्जवसुलीला स्थगिती देऊन शेतीमालाला हमीभाव दिला तरी शेतकरी सर्व कर्ज भरतील. परंतु, एक दीड रुपये कांदा आणि ३०-३५ रुपये तूर विकली जात असेल तर शेतकऱ्यांनी कर्ज कसे भरायचे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. शेतकरी आंदोलनात कर्जमुक्ती आणि हमीभावासाठी उतरलेल्या शेतकऱ्यांची घोर निराशा झाली असून, शेतकरी लढ्याला पुनरुजीवित करण्यासाठी शेतकरी संघटना पुन्हा नव्याने लढा उभारणार असल्याचे धोंडगे यांनी सांगितले. यावेळी रामचंद्र पाटील, गिरीधर पाटील, खेमराज कौर, सुनील पवार,भगवान बोराडे, शेखर पवार, अर्जून बोराडे, रामनाथ ढिकले, शंकर पूरकर, अनील धनवट आदि उपस्थित होते. शेतकरी संघटनेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढणाऱ्या लोकांचा समावेश असून, हे सर्व शरद जोशींच्या विचारांतून तयार झाले आहे. त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती सुधरविण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत शेतमालाला रास्त भाव मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी शेतकरी संघटना एकत्रित आली आहे.
- डॉ. गिरीधर पाटील, कृषितज्ज्ञ