रिक्षाचालकाचा संशयास्पद मृत्यू
By Admin | Updated: October 10, 2015 23:17 IST2015-10-10T23:16:43+5:302015-10-10T23:17:09+5:30
नातेवाइकांची तक्रार : घातपाताचा संशय; पोलिसांनी मात्र केली अपघाताची नोंद

रिक्षाचालकाचा संशयास्पद मृत्यू
नाशिक : मखमलाबाद गावाच्या पुढे मनोली शिवारात रिक्षा उलटून क्रांतिनगरमधील रिक्षाचालकाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि़९) रात्रीच्या सुमारास घडली आहे़ मयत रिक्षाचालकाचे नाव नीलेश बळीराम गव्हाळ (३५) असे असून, त्यांच्या कुटुंबीयांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे़ त्यानुसार जिल्हा शासकीय रुग्णालयात करण्यात आलेल्या शवविच्छेदनात व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे़ दरम्यान, या अपघाताची तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नीलेश बळीराम गव्हाळ (३५, रा़ उदय कॉलनी, क्रांतिनगर, पंचवटी) हे रिक्षाचालक असून, मालेगाव स्टॅण्ड ते मखमलाबाद या पट्ट्यावर व्यवसाय करीत होते़ शनिवारी (दि़१०) सकाळी दरी-मातोरी शिवारातील मनोली घाटात त्यांची उलटलेली रिक्षा (एमएच १५, झेड ९०६२) व मृतदेह आढळून आल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी नाशिक तालुका पोलिसांना दिली़ त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला व शवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविला़ दरम्यान, हा अपघात नसून घातपात करून मृतदेह या ठिकाणी आणून टाकल्याने तसेच रिक्षाचा अपघात दाखविण्याचा प्रयत्न मारेकऱ्यांनी केल्याचा आरोप मयत नीलेशच्या कुटुंबीयांनी केला आहे़ तसेच रात्री साडेनऊ वाजता नीलेशसोबत मोबाइलवर बोलणे झाले होते़ तसेच मयत नीलेशचा मृतदेह आढळला मात्र त्याचा मोबाइल, पॉकेट मिळाले नसल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे़ मयत नीलेशच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, बहीण आहे़ शहरात गुन्हेगारीने डोके वर काढले असून, त्यामुळे या रिक्षाचालकाचा मृत्यू संशयास्पद असल्याचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)