संसारातील संशय कल्लोळ; ‘बायको पहावी सांभाळून’
By Admin | Updated: December 3, 2015 23:45 IST2015-12-03T23:45:01+5:302015-12-03T23:45:31+5:30
राज्य नाट्य : प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद

संसारातील संशय कल्लोळ; ‘बायको पहावी सांभाळून’
नाशिक : रवि आणि प्रिया हे नवविवाहित दांपत्य सुखी संसाराचे स्वप्न पाहत असतात. दररोजचे धकाधकीचे जीवन बाजूला सारत आठवड्याच्या सुटीच्या दिवशी स्वत:साठी काही क्षण बाजूला ठेवून एकमेकांना वेळ देण्याच्या दृष्टीने नियोजन करतात, परंतु हे सुखाचे क्षण आपल्याच घराशेजारी राहणारे लोक कसे हिरावून घेतात याचे दृश्य ‘बायको पहावी सांभाळून’ या नाटकातून दाखविण्याचा प्रयत्न दिग्दर्शक भगवान देवकर यांनी केला आहे. परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे सुरू असलेल्या ५५ व्या राज्य नाट्य स्पर्धेत बुधवारी (दि. २) ‘बायको पाहावी सांभाळून’ या नाटकाचे सादरीकरण करण्यात आले.
एकाच इमारतीमध्ये राहणारे धडपडे गृहस्थ आणि रविच्या काही मित्रांसह घरातील नोकरदेखील या सुखी संसारामध्ये संशयरूपी विष पेरण्याचा प्रयत्न करताना दिसतात. संशयाचे रूपांतर कडाक्याच्या भांडणात होते आणि आपल्या पतीवर असलेला संशय दूर करण्यासाठी प्रिया मोलकरणीच्या बहिणीकडून अघोरी विद्येचा आधार घेत मंत्रतंत्राद्वारे पती पूर्वपदावर यावा यासाठी प्रयत्न करताना दिसते, परंतु यातून काहीही निष्पन्न होत नसल्याने प्रिया माहेरी निघून जाते. नाटकातील मुख्य कलाकार रवि आपली पत्नी घरी यावी यासाठी जीवापाड प्रयत्न करत असतो, आपल्याच मित्राला स्त्रीवेशातील पेहराव करायला सांगून प्रियाचा गैरसमज कसा दूर होतो याचे दृश्य नाटकातून दाखविण्यात आले आहे. सचिन उतेकर यांच्या लेखणीतून साकारलेले हे नाटक जेवढे विनोदी तेवढेच गंभीरदेखील आहे. या नाटकाचे संगीत संयोजन आनंद गांगुर्डे, मेघनाथ ठाकरे आणि भूषण भावसार यांनी केले आहे, तर प्रकाश योजनेची जबाबदारी ईश्वर जगताप यांनी सांभाळली आहे. (प्रतिनिधी)