शिक्षकांच्या समायोजनास न्यायालयाची स्थगिती
By Admin | Updated: September 19, 2016 00:07 IST2016-09-19T00:06:45+5:302016-09-19T00:07:21+5:30
शिक्षण संस्था महामंडळ : कार्यवाही थांबविण्याचे आवाहन

शिक्षकांच्या समायोजनास न्यायालयाची स्थगिती
नाशिक : महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने शिक्षक महाराष्ट्र शासनाच्या शिक्षक समायोजन अध्यादेशाविरोधात दाखल केलेल्या हरकत अर्जावर गुरुवारी (दि. १५) झालेल्या सुनावणीत स्थगिती दिली असून, या प्रकरणाची पुढील सुनावणी गुरुवारी (दि.२२) होणार आहे. तोपर्यंत राज्यभरातील समायोजनाची कार्यवाही स्थगित करण्याचे निर्देश न्यायालयाने शिक्षण विभागाला दिल्याची माहिती माजी केंद्रीय मंत्री तथा शिक्षण संस्था महामंडळाचे अध्यक्ष विजय पाटील, विभागीय अध्यक्ष कोंडाजी आव्हाड, प्रवक्ता बाळासाहेब पाटील व अॅड. नितीन ठाकरे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केले आहे.
या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय येईपर्यंत संस्थाचालक, मुख्याध्यापक व शिक्षक स्तरावर समायोन प्रक्रियेसंदर्भात कोणतीही कार्यवाही करू नये, असे आवाहन या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आले. राज्यातील विविध शाळांमध्ये २०१२ पासून नियमाप्रमाणे नेमलेले शिक्षका मान्यतेच्या प्रतीक्षेत आहेत. हजारो शिक्षकांना नेमणूक आदेश मिळून शिक्षणाधिकारी मान्यता देण्यासाठी अनेक सबबी शोधून टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे शिक्षणमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालून संबंधित शिक्षकांना मान्यता द्याव्यात आणि त्यानंतरच रिक्त पदांचा आढावा घ्यावा, अशी मागणी यावेळी महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केली. शिक्षकांच्या समायोजनाचा अधिकार व निर्णय शाळा व्यवस्थापनाचा आहे.
ही कायदेशीर बाजू दुर्लक्षित करून समायोजनासाठी मुख्याध्यापकांना वेठीस धरले जात असून, त्यांच्यावर कार्यवाहीसाठी सक्ती केली जात आहे. मुख्याध्यापकांना पगार बंद करण्याचे दबावतंत्र वापरले जात आहे. असे बेकायदेशीर प्रकार घडू नये यासाठी शासनानेही गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे मत महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. याप्रसंगी महामंडळाचे प्रवक्ते अनिकेत पाटील, पद्माकर धात्रक, अशोक मदाने व साहेबराव कुटे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)