आउटसोर्सिंगद्वारे साफसफाई ठरली वादग्रस्त : साधुग्राममधील ठेक्याचे अद्यापही कवित्व सुरू

By Admin | Updated: October 3, 2015 00:18 IST2015-10-03T00:17:40+5:302015-10-03T00:18:08+5:30

पर्वकाळातील स्वच्छतेवरून महापालिकेची दमछाक

Suspended by outsourcing, controversy continues: Sadhugram's contract still continues to be poetry | आउटसोर्सिंगद्वारे साफसफाई ठरली वादग्रस्त : साधुग्राममधील ठेक्याचे अद्यापही कवित्व सुरू

आउटसोर्सिंगद्वारे साफसफाई ठरली वादग्रस्त : साधुग्राममधील ठेक्याचे अद्यापही कवित्व सुरू

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यातील पर्वणीकाळात स्वच्छता व आरोग्यविषयक आव्हान महापालिकेने पूर्णपणे पेलले, असा छातीठोकपणे दावा पालिका प्रशासनही करू शकणार नाही. महापालिकेने रामकुंड-गोदाघाट परिसर, भाविकमार्ग आणि साधुग्राममध्ये आउटसोर्सिंगच्या माध्यमातून स्वच्छताविषयक कामांना प्राधान्य दिले, परंतु सर्वांत संवेदनशील भाग बनलेल्या ‘साधुग्राम’ परिसरातून घाण-कचऱ्याची होणारी ओरड पालिकेच्या आरोग्य विभागाची नेहमीच दमछाक करत राहिली. पर्वणीच्या दिवशी पोलिसांच्या अतिरेकी बंदोबस्तामुळे घंटागाड्यांचे केलेले नियोजन फसले. गावभर रस्त्यालगत उभ्या केलेल्या शौचालय आणि मुताऱ्यांना अनेक ठिकाणी आउटलेटच नसल्याने भाविकांना दुर्गंधीचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे, कुंभमेळ्यात स्वच्छता व तत्सम कामांमुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल, अशी जी दवंडी पिटवली गेली ती हवेतच विरली. साधुग्रामच्या ठेक्यावरून तर कुंभपर्वणी संपूनही प्रशासन आणि स्थायी समिती यांच्यातील विस्तव अजूनही विझलेला नाही.
सिंहस्थ कुंभमेळ्यातील पर्वकाळ हा नाशिककरांच्या दृष्टीने नेहमीच आव्हानात्मक राहिलेला आहे. पर्वकाळात लाखोंच्या संख्येने येणारे भाविक, त्यातून शहरातील स्वच्छतेच्या कामावर पडणारा ताण आणि नंतर उद्भवणारे साथीचे आजार यामुळे नाशिककर धास्तावलेले असतात. मागील सिंहस्थ कुंभपर्वणीनंतर शहरात मोठ्या प्रमाणावर डोळ्यांची साथ पसरली होती. यंदा प्रशासनाकडून कोट्यवधी भाविकांचा अंदाज व्यक्त केला गेल्याने शहराच्या आरोग्याविषयी चिंता होतीच. सुदैवाने, शहरात कुंभपर्वणीनंतर आरोग्यविषयक आणीबाणीची स्थिती उद्भवली नाही. मुळात एक कोटीहून अधिक भाविक येण्याचा अंदाजच फोल ठरला. पहिल्या पर्वणीला पोलीस प्रशासनाच्या पराक्रमामुळे भाविकांनी पाठ फिरविली तर पहिल्या पर्वणीच्या दिवशी इतरांना आलेल्या अनुभवांच्या आधारे भाविकांनी दुसऱ्या आणि तिसऱ्या पर्वणीला गर्दीचा अंदाज घेत हजेरी लावली.
महापालिकेने रामकुंड-गोदाघाट परिसर, भाविकमार्गासाठी स्वच्छतेचा ठेका दिला होता, तर साधुग्रामच्या स्वच्छतेच्या ठेक्याचा वाद थेट न्यायालयात जाऊन पोहोचल्याने प्रशासनाने अन्य कंत्राटदारांच्या मदतीने साधुग्रामच्या साफसफाईवर भर दिला. साधुग्राममधील स्वच्छता हे सर्वांत मोठे आव्हान महापालिका प्रशासनापुढे होते. साधुग्राममध्ये प्रत्येक खालशांमध्ये भोजनावळी उठत असल्याने उष्टी-खरकटी, पत्रावळ्यांचा ढीग साचत होता. याशिवाय रस्त्यावर पडणाऱ्या कचऱ्याची समस्या होतीच. महापालिकेने साधुग्राम व रामकुंड परिसरात २६ घंटागाड्यांची व्यवस्था उपलब्ध करून दिली होती, तरीही साधुग्राममधून घाण-कचरा उचलला जात नसल्याच्या तक्रारींचा पाढा साधू-महंतांकडून वाचला जात होता. महापालिकेने साधुग्राममध्ये आखाडे व खालशांसाठी सुमारे नऊ हजार शौचालये व स्नानगृहांची व्यवस्था उभारली होती, परंतु सुरुवातीपासूनच या शौचालये-स्नानगृहांच्या कामाबाबत तक्रारींचा सूर निघत राहिला. खुद्द पालकमंत्र्यांनीही वारंवार केलेल्या पाहणीत त्याविषयी नाराजी व्यक्त केलेली होती. १९ आॅगस्टला साधुग्राममध्ये आखाड्यांच्या ध्वजारोहण सोहळ्यानंतर अनेक खालशांचे आगमन होऊ लागले आणि शौचालयांची स्थिती बिकट बनत गेली. महापालिकेमार्फत आउटसोर्सिंगद्वारे जे परप्रांतीय कामगार स्वच्छतेचे काम करत होते त्याच मंडळींची उघड्यावरची ‘डबापरेड’ही साधूंच्या रोषाला कारणीभूत ठरली. महापालिकेने भाविकमार्गावर ठिकठिकाणी शौचालय व मुताऱ्यांची सुविधा उपलब्ध करून दिली होती, परंतु अनेक ठिकाणी त्यांना आउटलेटच नसल्याचे उघडकीस आले. तिसऱ्या आणि अखेरच्या पर्वणीला तर पावसामुळे महापालिकेच्या या व्यवस्थेची अगदीच दैना झाली. तीनही पर्वणी मिळून सुमारे १४०० टन कचरा खतप्रकल्पावर नेण्यात आला, परंतु खतप्रकल्पावर कचऱ्याचे ढीग साचत असताना पूर्ण क्षमतेने खतप्रकल्प चालविणे महापालिकेला शक्य होऊ शकले नाही. कुंभकाळात आरोग्य व स्वच्छताविषयक तक्रारी वाढत असताना आरोग्याधिकारी अश्रू ढाळत हतबलता व्यक्त करत होते.
प्रशासनातील मुखंड आख्खी दुनिया मुठीत असल्यासारखे वावरत होते आणि टिवटिवाटातूनच आपले कर्तृत्व दाखवत होते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पर्यावरणपूरक हरित कुंभ साजरा करण्यासाठी नाशिककरांनी दिलेली साथ आणि सेवाभावी संस्थांनीही रस्त्यावर उतरत स्वच्छतेसाठी लावलेला हातभार यामुळे शहरात स्वच्छता राखल्याचे उसने का होईना श्रेय महापालिका घेत आहे.

Web Title: Suspended by outsourcing, controversy continues: Sadhugram's contract still continues to be poetry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.