जमिनी संपादन अध्यादेशाला स्थगिती द्या : शरद पवार
By Admin | Updated: July 30, 2016 01:38 IST2016-07-30T01:35:54+5:302016-07-30T01:38:13+5:30
जमिनी संपादन अध्यादेशाला स्थगिती द्या : शरद पवार

जमिनी संपादन अध्यादेशाला स्थगिती द्या : शरद पवार
सिन्नर : प्रस्तावित मुंबई-नागपूर समृध्दी महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्याच्या अध्यादेशाला स्थगिती द्या, अशी मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केली आहे. जमिनी संपादित करण्यापूर्वी शेतकऱ्यांना विश्वासात घ्या, घाई करू नका असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
सिन्नर, इगतपुरी व कोपरगाव येथील शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला विरोध दर्शविला आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्त्वाखाली शेतकऱ्यांनी संघर्ष समितीची स्थापना केली आहे. या संघर्ष समितीच्या शेतकऱ्यांनी शुक्रवारी सायंकाळी शरद पवार यांची भेट घेऊन आपले गाऱ्हाणे मांडले. त्यावेळी शेतकऱ्यांसोबत बोलतांना पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे आपण यासंबंधी मागणी करणार असल्याचे सांगितले.
शुक्रवारी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, सिन्नरचे तालुकाध्यक्ष राजाराम मुरकुटे, शहराध्यक्ष रवींद्र काकड, शहाजी पवार, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गाढवे, रामदास जायभावे, यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी मुंबई येथे जावून आमदार आव्हाड यांच्या नेतृत्त्वाखाली पवार यांनी भेट घेतली.
या महामार्गाची रुंदी किती, किती जमिनी संपादित कराव्या लागतील याबाबतची माहिती शासनाने द्यायला हवी होती असे सांगितले. ज्यांच्या जमिनी यापूर्वी विविध प्रकल्पासाठी संपादित केल्या आहेत पुन्हा पुन्हा त्यांच्या जमिनी संपादित करुन प्रश्न निर्माण करु नका असे पवार यावेळी म्हणाले. दहा वर्षापूर्वी या भागात असाच प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी संरक्षण विभाग व आम्ही बसून या प्रश्नावर मार्ग काढला होता असे पवार म्हणाले.
शेतकऱ्यांना विश्वासात न घेता जमिनी संपादित करण्यासाठी काढण्यात आलेला अध्यादेश मागे घ्यावा अशी मागणी पवार यांनी केली. आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत याच विषयावर बैठकीला जात निघालो असल्याचे ते म्हणाले. त्यांच्याकडेही आपण हीच मागणी करणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
जेथे प्रकल्प होत आहे तेथील प्रमुख लोकांना एकत्र बसवा, त्यांच्यासोबत चर्चा करा. उगाच त्यांना विश्वासात न घेता जमिनींचे ताबे घेणे योग्य नसल्याचे ते म्हणाले. त्यानंतर पवार हे मुख्यमंत्र्यासोबत बैठकीला निघून गेले. तत्पूर्वी संघर्ष समितीच्या शेतकऱ्यांनी जमिनी देण्यास आपला विरोध असल्याचे पवार यांना सांगितले. जमिनी संपादित केल्यास आपल्यावर आत्महत्या करण्याची वेळ येईल अशी भितीही शेतकऱ्यांनी व्यक्त केली. (वार्ताहर)