संशयित महिलेस अटक
By Admin | Updated: January 13, 2017 01:23 IST2017-01-13T01:22:58+5:302017-01-13T01:23:11+5:30
गणेश बॅँक अपहार : दोन दिवसांची पोलीस कोठडी

संशयित महिलेस अटक
नाशिक : अशोकस्तंभ येथील श्री गणेश सहकारी बॅँकेमध्ये तत्कालीन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपापसात संगनमत करून सहा कोटीपेक्षा अधिक रकमेच्या अपहारप्रकरणी पोलिसांनी गुरुवारी (दि.१२) संशयित कविता शर्मा या कर्मचाऱ्यास एका बॅँकेतून अटक केली आहे.
याबाबत सरकारवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कविता शर्मा या श्री गणेश सहकारी बॅँकेत तत्कालीन कर्मचारी होत्या. त्यांच्याविरुद्धही काही पुरावे पोलिसांच्या हाती लागल्याने अपहारामध्ये शर्मा यांचा सहभाग असल्याच्या संशयावरून पोलिसांनी थेट दुसऱ्या एका बॅँकेमधून अटक केली. शर्मा या बॅँकेत नोकरी करत होत्या. श्री गणेश सहकारी बॅँकेमध्ये २०१२ ते २०१४ सालापर्यंत कार्यरत असलेले अधिकारी, कर्मचारी, लिपिक, शाखा व्यवस्थापक यांनी संगनमताने बॅँकेचा व ठेवीदारांचा विश्वासघात करून बॅँकेत बनावट कर्जप्रकरणे दाखल करून घेत मोठ्या रकमेचा अपहार केल्याचे लेखापरीक्षणात उघड झाले आहे. यामध्ये एकूण २४ संशयितांनी अशोकस्तंभ येथील बॅँकेच्या मुख्य शाखेत सहा कोटी सात लाख रुपयांचा अपहार करून पिंपळगाव बसवंत येथील शाखेतही अशाच प्रकारे अपहार केला आहे. दोन्ही शाखांचे मिळून ६ कोटी ७ लाख १५ हजार रुपयांचा अपहार केल्याची फिर्याद सनदी लेखापाल राठी यांनी दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी तपास करत संशयितांविरुद्ध पुरावे गोळा करून त्यांना अटक करण्यास सुरुवात केली आहे. शर्मा यांनाही पोलिसांनी संशयावरून अटक केली.