सराईत गुन्हेगार हत्त्येप्रकरणी संशयितास अटक
By Admin | Updated: July 28, 2014 00:42 IST2014-07-28T00:00:52+5:302014-07-28T00:42:11+5:30
सराईत गुन्हेगार हत्त्येप्रकरणी संशयितास अटक

सराईत गुन्हेगार हत्त्येप्रकरणी संशयितास अटक
पंचवटी : पूर्ववैमनस्यातून फुलेनगर येथे राहणारा सराईत गुन्हेगार सोनू भरसागर याच्या हत्त्येप्रकरणी पंचवटी पोलिसांनी अक्षय छाबरिया या संशयिताला अटक केली आहे, तर त्याचा दुसरा साथीदार पसार झाला आहे.
शनिवारी रात्री सोनू नभी भरसागर याची विशाल भालेराव व अक्षय छाबरिया या दोघांनी जुन्या वादातून फुलेनगर पाटाजवळ हत्त्या केली. त्यानंतर दोघेही संशयित फरार झाले होते. रविवारी छाबरिया हा त्याच्या उपनगर येथील घराजवळ असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. या घटनेतील मयत भरसागर याच्या हत्त्येप्रकरणी मयताची पत्नी वंदना भरसागर हिने पंचवटी पोलिसांत विशाल भालेराव व त्याचा मित्र अक्षय अशा दोघांनी पती भरसागर याला रात्री घरातून बोलावून नेऊन जुन्या वादातून कुरापत काढून शिवीगाळ करून धारदार शस्त्राने पोटावर वार करून हत्त्या केल्याची तक्रार नोंदविली होती. पंधरवड्यापूर्वी मयत व त्याच्या दोघा मित्रांना परिसरातीलच काही संशयितांनी मोबाइल चोरी केल्याच्या कारणावरून बेदम मारहाण करून जखमी केले होते. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. या प्रकरणात पोलिसांनी छाबरिया याला ताब्यात घेतले असून, त्याचा साथीदार फरार झाला आहे. भरसागर याची हत्त्या पूर्ववैमनस्यातून झाली असल्याचे स्पष्ट झाले असून, आणखी काही संशयितांचा यात सहभाग असण्याची दाट शक्यता असल्याने पोलीस त्यादृष्टीने शोध घेत आहेत.
दरम्यान, या हत्त्या प्रकरणात फरार असलेला भालेराव हादेखील सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात विविध प्रकारचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पंचवटी पोलिसांनी दिली आहे. (वार्ताहर)