सूर-तालाचे उमटले आनंद तरंग...
By Admin | Updated: September 27, 2014 00:19 IST2014-09-27T00:19:38+5:302014-09-27T00:19:54+5:30
स्वरवंदना : सतारवादनाची मैफल रंगली

सूर-तालाचे उमटले आनंद तरंग...
नाशिक : सतारीचे सूर आणि तबलावादनातून घुमलेले तालस्वर यांचा सुरेख मिलाफ घडविणारी मैफल कुसुमाग्रज स्मारकात रसिकांनी अनुभवली आणि आनंद तरंग निर्माण करणाऱ्या या मैफलीतून शिष्यांनीही गुरूंप्रती कृतज्ञतेचा भाव व्यक्त केला.
उस्ताद शाहीद परवेझ संगीत गुरुकुल आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्या वतीने ‘स्वरवंदना’ या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. सौ. उमा निशाणदार यांच्या शिष्यांनी सादर केलेल्या सतारवादनाने प्रारंभ झाला. सुमंत मंजुनाथ, डॉ. स्मिता कापडणीस, सुनीता देशपांडे, नीलिमा कुलकर्णी, सुजाता मंजुनाथ, डॉ. स्वाती शहा, डॉ. गीताली भट, ज्योती डोखळे, शर्मिला जोशी यांनी सतारवर राग वृंदावनी सारंग सादर करत उपस्थितांकडून दाद मिळविली. त्यानंतर पूनम गारे यांनी राग यमन सादर केला. डॉ. उद्धव आष्टुरकर यांचे शिष्य प्रसाद रहाणे यांनीही सतारवादन शैलीचे दर्शन घडवित मंत्रमुग्ध केले. उमा निशाणदार यांनी राग बागेश्री पेश केला. त्यानंतर पंडित आनंद चॅटर्जी यांचे शिष्य मकरंद तुळाणकर यांचे सोलो तबलावादन झाले. त्यांना साथसंगत प्रशांत महाबळ (संवादिनी), सुजित काळे व गौरव तांबे (तबला) यांनी केली. शेवटी विनया फणसाळकर यांचे सतारवादन झाले. त्यांना तबलासाथ प्रदीप फणसाळकर यांनी केली. सूत्रसंचालन सुप्रिया फणसाळकर यांनी केले. प्रारंभी ज्येष्ठ तबलावादक जयंत नाईक व मकरंद तुळाणकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी उस्ताद शाहीद परवेझ संगीत गुरुकुलचे अध्यक्ष डॉ. उद्धव आष्टुरकर, सचिव राधिका गोडबोले, उपाध्यक्ष उमा निशाणदार, मोहिनी कुलकर्णी आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)