आश्चर्य, मनपाच्या कोरोनाबळींची माहितीही प्रशासनाकडे नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:12 IST2021-06-01T04:12:18+5:302021-06-01T04:12:18+5:30
महापालिकेच्या सोमवारी (दि. ३१) झालेल्या महासभेत हा प्रकार घडला. महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा वैद्यकीय विमा काढण्याचा प्रस्ताव महासभेत मांडण्यात ...

आश्चर्य, मनपाच्या कोरोनाबळींची माहितीही प्रशासनाकडे नाही
महापालिकेच्या सोमवारी (दि. ३१) झालेल्या महासभेत हा प्रकार घडला. महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा वैद्यकीय विमा काढण्याचा प्रस्ताव महासभेत मांडण्यात आला होता. मात्र, त्यावर चर्चा करताना मनसेचे ज्येष्ठ नगरसेवक सलीम शेख यांनी कोरोना काळात किती कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला, याबाबत प्रश्न विचारला. मात्र, त्याविषयी प्रशासनातील अधिकाऱ्यांना माहिती देता आली नाही. प्रशासन उप-आयुक्त मनोज घोडे यांना विचारल्यानंतर त्यांनी आरोग्य विभागाकडे बोट दाखवले. घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या संचालक डॉ. कल्पना कुटे यांनी वैद्यकीय विभागाकडे माहिती असेल, असे सांगितले. त्यामुळे नगरसेवक नाराज झाले. वैद्यकीय विमा काढण्याचा प्रस्ताव गेल्या वर्षी महासभेत आला तेव्हा एका मिनिटात त्यास मंजुरी देण्यात आली. मात्र, प्रशासनाने अजूनही हा विषय घोळात ठेवल्याचा आरोप सलीम शेख तसेच अन्य नगरसेवकांनी केला. कर्मचाऱ्यांचा वैद्यकीय विमा काढणार, असे कर्मचारी संघटनांना लेखीपत्र देणाऱ्या प्रशासन उप-आयुक्त मनोज घोडे पाटील यांना विचारणा केल्यानंतर वैद्यकीय विमा हा विषय कामगार कल्याण विभागाच्या अखत्यारित आहे, असे सांगितल्यानंतर त्यावर देखील टीका करण्यात आली. काही अतिरिक्त आयुक्त आर्थिक मर्यादा ओलांडून काम करतात, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जगदीश पाटील यांनी केली.
दरम्यान, परसेवेतील अधिकारी महापालिकेत दाखल होतात, परंतु मोजकेच अधिकारी योग्य काम करतात, बाकीचे काम करीत नाहीत, अशा शब्दांत महापौर सतीश कुलकर्णी यांनी नाराजी व्यक्त केली. मुख्य लेखापाल महाजन हे तर परसेवेतून आलेले अत्यंत नकारात्मक अधिकारी आहेत. कोणत्याही प्रस्तावाबाबत त्यांची नकारात्मकता सुरू असते, असे महापौरांनी सुनावले.
इन्फो...
आयुक्त सभेस न आल्यानेही नाराजी
महापालिका आयुक्त कैलास जाधव हे अर्थसंकल्पीय सभेत सहभागी न झाल्याने देखील नगरसेवकांनी विचारणा केली. सुरुवातीला तर महापालिकेच्या बैठकीत आयुक्त हे महापाैरांना न सांगता गैरहजर राहिल्याबद्दल गटनेते जगदीश पाटील यांनी सभागृहाच्या प्रतिमेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे सांगितले. आयुक्त शासकीय बैठकीस गेले आहेत, लवकरच ते येतील, असे सांगण्यात आले. मात्र, सभा संपेपर्यंत आयुक्त बैठकीत सहभागी झाले नव्हते.