सरप्राईज व्हिजिटीचा बार फुसका
By Admin | Updated: April 24, 2015 01:48 IST2015-04-24T01:46:00+5:302015-04-24T01:48:40+5:30
सरप्राईज व्हिजिटीचा बार फुसका

सरप्राईज व्हिजिटीचा बार फुसका
नाशिकरोड : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात गुरुवारी कारागृह अप्पर पोलीस महासंचालक मीरा बोरवणकर व दक्षता पथकाने सरप्राईज व्हिजिट करून कारागृहाची झडती घेतली; मात्र या झडतीत कारागृहात त्यांना कोणतीही आक्षेपाहार्य वस्तू आढळून आली नाही. एरव्ही मोबाइल, अमलीपदार्थ आणि हत्यार आढळणाऱ्या नाशिकरोड कारागृहात महासंचालकांच्या व्हिजिटमध्ये काहीच आढळून न आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नागपूर कारागृहातून गेल्या महिन्यात पाच कैदी सिनेस्टाइल पद्धतीने पळून गेले आहेत. त्यानंतर नागपूर कारागृहात अचानक राबविलेल्या झडती सत्रात असंख्य मोबाइल, चैनीच्या वस्तू आढळल्याने कारागृहातील सावळा गोंधळ समोर आला होता. या पार्श्वभूमीवर नाशिकरोड कारागृहात राबविलेल्या झडतीसत्रात काहीच आढळून न आल्याने कारागृहात कैद्यांना झडतीची ‘टीप’ दिली गेली असावी असाच अर्थ काढला जात आहे. कारागृहातून कैदी पळून जाणे, अमली पदार्थ-मोबाइल सापडणे, कैद्याची आत्महत्त्या, मारामाऱ्या अशा विविध घटनांमुळे नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह नेहमीच चर्चेत असते. नागपूरच्या घटनेनंतर स्थानिक कारागृह प्रशासनाचे तीन वेळा कारागृहात झडती सत्र राबविले. त्या झडती सत्रात काही न सापडल्याचे सांगितले गेले. त्या झडती सत्रातदेखील मोबाइल सापडल्याची चर्चा होती; मात्र कागदावर काहीच नोंदले गेले नाही.