सुरगाणा तालुका दुष्काळी जाहीर करा
By Admin | Updated: July 17, 2014 00:53 IST2014-07-15T00:21:06+5:302014-07-17T00:53:45+5:30
सुरगाणा तालुका दुष्काळी जाहीर करा

सुरगाणा तालुका दुष्काळी जाहीर करा
सुरगाणा : तालुक्यात शासनाने त्वरित दुष्काळ जाहीर करून जनतेचे प्रश्न गंभीरतेने सोडवावेत या मागणीसाठी माकपातर्फे सोमवारी मोर्चा काढण्यात आला.मोर्चाचे नेतृत्व माजी आमदार जे. पी. गावित यांनी केले.
याप्रसंगी गावित म्हणाले की, आणखी एक महिना पाऊस आला नाही तर स्थलांतर होण्याची शक्यता आहे. पण पाऊस सुरूच नसल्याने जाणार तरी कुठे त्यासाठी नियोजनाची गरज असून, टँकरने योग्य त्या ठिकाणी व वेळेत पाणी द्यावे लागणार आहे.
स्थानिक प्रशासनाचे पावसाअभावी निर्माण झालेल्या गंभीर दुष्काळी परिस्थितीकडे साफ दुर्लक्ष असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. अधिकारी हे केवळ पगारपुरतेच नोकरी करत असून, तालुक्यात ओढवलेल्या दुष्काळी परिस्थितीबाबत कुणालाही विचारणा केलेली नाही. त्यामुळे आता आपल्यालाच पुढे यावे लागणार आहे.
वनजमिनीबाबत बोलताना गावित यांनी कसत असलेली संपूर्ण जमीन ही सातबारा उतारावर लाभार्थीच्या नावे नोंद करून मिळावी अशी मागणी केली. अद्याप जवळपास चार हजार दावे तपासणी होणेबाकी असून, ती त्वरित पूर्ण करून थोडी-थोडकी न देता कसत असलेली संपूर्ण जमीन नावावर करून दिली जावी. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना हाताला काम नसल्याने मागेल त्याला काम मिळावे यासाठी ३०० रुपये रोज व धान्य उपलब्ध करून दिले जावे, अशी मागणी त्यांनी केली.