पुरवठा खात्याची बत्ती गूल
By Admin | Updated: July 30, 2015 00:10 IST2015-07-30T00:02:30+5:302015-07-30T00:10:46+5:30
कामकाज ठप्प : देयक भरण्यावरून वाद

पुरवठा खात्याची बत्ती गूल
नाशिक : शहर धान्य वितरण कार्यालयातील सुमारे वीस हजाराहून अधिक रुपयांचे देयक गेल्या काही महिन्यांपासून थकल्याने वीज कंपनीने कार्यालयाचा विद्युतपुरवठा खंडित केला असून, दोन दिवसांपासून वीजच नसल्याने कार्यालयाचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील जुन्या अल्पबचत भवनाला लागूनच शहर धान्य वितरण कार्यालय असून, गेल्या वर्षी जुन्या धान्य वितरण कार्यालयात पावसाचे पाणी घुसल्याने कार्यालय स्थलांतरित करण्यात आले होते. तेव्हापासून या कार्यालयाचे वीज देयक थकल्याचे सांगितले जात आहे. या कार्यालयाच्या इमारतीतच महसूल कर्मचारी संघटनेचे कार्यालय असून, तलाठी पतपेढीचे कामही याच इमारतीत चालत असल्याने एकाच मीटरवरील विजेचा वापर त्यासाठी केला जात असल्याचा दावा पुरवठा कार्यालयाने केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून वीज कंपनीकडून थकीत देयकासाठी तगादा लावला जात असताना देयक भरण्यावरून अंतर्गत वाद सुरू असल्याने तोडगा निघेपर्यंत वीज कंपनीला पुरवठा सुरू ठेवण्याची विनंती केली गेली होती. त्यामुळे वीज कंपनीने पुरवठा सुरू ठेवला; मात्र थकीत रक्कम वाढतच जात असल्याचे पाहून वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी सकाळी कार्यालयाचा पुरवठा खंडित केला.
धान्य वितरण कार्यालयातील वीज गूल झाल्याने कामकाज ठप्प झाल्याची बाब जिल्हा पुरवठा कार्यालयाला अवगत करण्यात आले असून, वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्यासाठी पर्यायांचा शोध घेतला जात आहे. (प्रतिनिधी)