राज्य नाट्य स्पर्धेचे शानदार उद्घाटन
By Admin | Updated: November 18, 2015 00:02 IST2015-11-18T00:01:51+5:302015-11-18T00:02:36+5:30
प्राथमिक फेरी : ५ डिसेंबरपर्यंत रंगणार स्पर्धा

राज्य नाट्य स्पर्धेचे शानदार उद्घाटन
नाशिक : ५५व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे उद्घाटन आज परशुराम साईखेडकर नाट्यगृहात उत्साहात झाले. येत्या ५ डिसेंबरपर्यंत ही स्पर्धा रंगणार असून, त्यात एकूण २१ नाटके सादर होणार आहेत.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष रवींद्र कदम होते. ज्येष्ठ रंगकर्मी सतीश सामंत यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. परीक्षक श्रीकांत फाटक, शमा सराफ, अॅड. देवेंद्र यादव, सावानाचे नाट्यगृह सचिव सुरेश गायधनी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी रवींद्र कदम यांनी राज्य नाट्य स्पर्धेच्या ५५ वर्षांच्या दीर्घ परंपरेचा गौरव करीत स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. स्पर्धेचे समन्वयक राजेश जाधव, ईश्वर जगताप, हेमंत गव्हाणे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. स्पर्धेत आज सादर होणाऱ्या ‘लागता डोहाळे कुंभाचे’ नाटकाचे लेखक-दिग्दर्शक नेताजी भोईर यांचा सावानाच्या वतीने सत्कार करण्यात आला. राजेश शर्मा यांनी सूत्रसंचालन केले. सहसमन्वयक मीना वाघ यांनी आभार मानले. सावानाचे कार्यवाह मिलिंद जहागिरदार, सुनील ढगे आदिंसह मान्यवर उपस्थित होते.