पाऊस थांबल्याने घडले सूर्यदर्शन; विसर्गात कपात
By Admin | Updated: August 9, 2016 01:15 IST2016-08-09T01:14:51+5:302016-08-09T01:15:01+5:30
पाऊस थांबल्याने घडले सूर्यदर्शन; विसर्गात कपात

पाऊस थांबल्याने घडले सूर्यदर्शन; विसर्गात कपात
नाशिक : आठवडाभर नाशिक शहरासह जिल्हावासीयांना जोखडून ठेवलेल्या पावसाने सोमवारी पूर्ण विश्रांती घेतल्याने नागरिकांना सूर्यदर्शन झाले. लख्ख सूर्यकिरणांनी सकाळ उजाडताच, सर्वत्र हर्षोल्लासाचे वातावरण निर्माण होऊन हायसे वाटले. दरम्यान, पाऊस पूर्णत: थांबल्यामुळे धरणांमधून केल्या जाणाऱ्या पाण्याचा विसर्गही कमी करण्यात येऊन परिणामी गोदावरीचा पूर ओसरण्यास सुरुवात झाली आहे.
गेल्या शनिवारपासून सुरू झालेल्या पावसाने शहरासह जिल्ह्याला झोडपून काढले. त्यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात कमालीची वाढ होण्यास मदत झाली. त्याचबरोबर खरिपाच्या पेरण्याही करण्यात आल्या. धरणांमधून पाणी सोडल्याने जिल्ह्यातील सर्वच नद्या, नाल्यांना पूर आला. पावसाचा जोर सहा दिवस कायम राहिल्याने सूर्यदर्शनही दुर्मिळ झाले होते.
मात्र रविवारी सूर्याने तुरळक हजेरी लावल्यानंतर सोमवारी पावसाने पूर्ण विश्रांती घेतली. त्यामुळे जनजीवन सुरुळीत झाले. सकाळीच लख्ख सूर्यप्रकाश पडल्यामुळे सर्वत्र हर्षाेल्लासाचे वातावरण दिसून आले, तर
पाऊस थांबल्यामुळे पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेल्यांना आवरासावर करण्यास संधी मिळाली. धरणाच्या पाण्याचाही विसर्ग कमी करण्यात आला, त्यामुळे गोदावरीचा पूर ओसरण्यास मदत झाली. (प्रतिनिधी)