उन्हाच्या काहिलीने नाशिककर बेजार
By Admin | Updated: March 29, 2017 23:41 IST2017-03-29T23:40:57+5:302017-03-29T23:41:16+5:30
नाशिक : राज्यात सर्वत्र उन्हाचा कहर सुरू असून, नाशिकही त्यापासून सुटले नाहीत.

उन्हाच्या काहिलीने नाशिककर बेजार
नाशिक : राज्यात सर्वत्र उन्हाचा कहर सुरू असून, नाशिकही त्यापासून सुटले नाहीत. नाशिकमधील उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला असून त्यामुळे सर्दी, खोकला, थंडी, संसर्गजन्य ताप, शरीरातील क्षार कमी होणे, चक्कर येणे, उष्माघात, स्वाइन फ्लू, गोवर, कांजण्या, नागीण आदि विविध प्रकारच्या आजारांनी डोके वर काढले आहेत. शहरातील खासगी, शासकीय दवाखान्यांत या तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत चालली असून, नागरिकांनी या वाढत्या तपमानात स्वत:ची काळजी न घेतल्यास आजाराची तीव्रता वाढण्याची शक्यता डॉक्टरमंडळींकडून वर्तविली जात आहे. अचानक वाढलेल्या या उष्म्यापासून नागरिकांनी स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांच्याकडून करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
सध्या उन्हाचा तडाखा वाढल्याने शरीरातील पाणी कमी होऊन चक्कर येणे, ग्लानी येणे, थकवा या तक्रारी वाढल्या आहेत. सध्या तपमान वाढल्याने निसर्गात एक गंमत पहायला मिळते. या दिवसात पाणी लवकर तापते व लवकर थंडही होते. मात्र जमीन उशिरा तापते व ती थंड होण्यासही खूप उशीर लागतो. त्यामुळे सायंकाळीही आपल्याला वातावरणात उष्मा जाणवतो. फ्रीजमधील पाणी, शीतपेये, बर्फगोळा, कुल्फी, मिल्कशेक या गोष्टी टाळाव्यात. यापेक्षा कैरीचे पन्हे, कोकम सरबत, लिंबू सरबत अशा पारंपरिक गोष्टींचा वापर वाढवावा. शक्यतो बाहेर जाणे टाळावे व गरजेचे असेल तर सोबत पाण्याची बाटली, टोपी, रुमाल या गोष्टी असू द्याव्यात. दिवसातून ३ ते ४ लिटर पाणी प्यावे. घसादुखी, सर्दी, खोकला, ताप, स्वाइन फ्लू यांचा प्रादुर्भाव सध्या वाढला आहे. वाढत्या उष्णतेने आपल्या शरीरातील प्रतिकार क्षमता कमी होते व आजारांची लागण लवकर होते. दिवसभरात घरातही गारवा येईल याच काळजी घ्यावी. खिडक्यांना पडदे लावा. शक्य असल्यास रात्री खिडक्या उघड्या ठेवा. हवा खेळती राहील, याची व्यवस्था करावी. - डॉ. राज देशपांडे, होमिओपॅथी तज्ज्ञ
अचानक उन्हाची तीव्रता वाढली आहे. अशा परिस्थितीत लहान मुले, वृद्ध व्यक्ती यांची विशेष काळजी घ्यावी लागते. त्यांच्या प्रकृतीला हा वातावरणातला बदल सहन होत नाही. नागरिकांनी आहारात द्रवपदार्थांचा वापर वाढवावा. दूध, खीर, आमटी, नैसर्गिक शीतपेये यांचे प्रमाण वाढवावे. परीक्षेचे दिवस असल्याने उन्हात बाहेर पडण्यावाचून पर्याय नसला तरी काळजी घ्यावी. उन्हातून आल्यावर लगेच थंड पाणी पिऊ नये. फ्रीजमधले पाणी, आइस्क्रीम टाळावेत कारण यामुळे सर्दी, कफचा प्रादुर्भाव होऊ शकतो. या काळात जिवाणू-विषाणूंची संख्या झपाट्याने वाढते. यामुळे कांजिण्या, गोवर, नागीण यांची लागण वाढू शकते. या दिवसात बाहेरचे खाणे-पिणे टाळावे. अंघोळीच्या पाण्यात कडुनिंबाचा पाला टाकावा. आहारात लोण्याचा वापर वाढवावा. गुलकंद, तुकुमराईची खीर, कोकम सरबत आदिंचे सेवन वाढवावे. या दिवसात त्वचा कोरडी पडणे, ओठ उलणे असेही प्रकार होतात. गाईच्या तुपाचा वापर करावा. रात्री झोपताना कांदा किसून अंगाला लावावा. - डॉ. राजश्री पाटील, आयुर्वेद तज्ज्ञ
सध्या अचानक वाढलेल्या तपमानामुळे थंडी, ताप, शरीरातील पाणी कमी होणे, अशा तक्रारी वाढल्या असून, या काळात नागरिकांनी स्वत:ची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. घराबाहेर पडताना प्रत्येकाने डोेळ्यांना गॉगल, कॅप, पांढरे सुती कपडे, स्कार्फ, रुमाल, सनकोट आदिंचा वापर आवर्जून करावा. दुपारी १ ते ५ उन्हात बाहेर फिरणे शक्यतो टाळावे. या दिवसात भरपूर पाणी प्यावे. लिंबूपाणी, नारळपाणी आदि नैसर्गिक पेयांचा वापर वाढवावा. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणार नाही याची काळजी घेतल्यास प्रत्येकास उन्हाळा सुसह्य होऊ शकतो. - डॉ. नरेंद्र पाटील, फॅमिली फिजीशियन