शहरात वाढले उन्हाचे चटकेअसह्य
By Admin | Updated: March 26, 2015 00:15 IST2015-03-26T00:08:22+5:302015-03-26T00:15:21+5:30
उकाडा : कमाल आणि किमान तपमानात झाली वाढ

शहरात वाढले उन्हाचे चटकेअसह्य
नाशिक : मार्च महिना संपत आला असतानाच वैशाख वणव्याची चाहूल लागली असून, गेल्या दोन दिवसांपासून उन्हाचे चटके चांगलेच जाणवू लागले आहेत. मार्चमध्येच कमाल तपमानाचा पारा ३८.३ अंश सेल्सिअसवर जाऊन पोहोचला असून, त्याची चाळिशीकडे वाटचाल सुरू झाली आहे, तर दुसरीकडे किमान तपमानातही मोठी वाढ होते आहे.
काही दिवसांपूर्वी शहरात ढगाळ हवामानाने मुक्काम ठोकला होता. दरम्यानच्या काळात जोरदार पाऊस व गारपिटीनेही तडाखा दिला. त्यामुळे वातावरणात गारवा जाणवत होता. सकाळी थंडी, दुपारी ऊन व रात्री पाऊस अशी परिस्थितीही नाशिककरांनी काही दिवस अनुभवली. आठवडाभरापासून मात्र हे वातावरण निवळले असून, सकाळी दहा वाजेपासूनच कडक ऊन जाणवत आहे.
दरम्यान, गेल्या चार दिवसांत शहराच्या तपमानात सुमारे तीन अंशांनी वाढ झाली आहे. गेल्या शुक्रवारी (दि. २०) शहराचे कमाल तपमान ३५.६ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले होते. त्यात रविवारी दोन अंशांनी भर पडून ते ३८ अंशांवर पोहोचले. उन्हाच्या वाढत्या चटक्यामुळे नागरिक डोक्यावर टोपी, उपरणे, तर महिला सनकोट परिधान करूनच घराबाहेर पडत आहेत. शहरातील रसवंतीगृहे सुरू झाली असून, शीतपेयांच्या मागणीतही वाढ झाली आहे. सायंकाळी आइस्क्रीम पार्लरवरील गर्दीही वाढली आहे.
रस्त्यांवर शुकशुकाट
उन्हाचे चटके बसू लागल्याने दुपारनंतर रस्त्यांवरील रहदारीवर परिणाम होऊ लागला आहे. सध्या सुरू असलेले परीक्षेचे दिवस आणि क्रिकेट वर्ल्डकपचा फिव्हर यातच उन्हाचा चटका यामुळे दुपारी १ नंतर शहरातील दुय्यम रस्त्यांवर संपूर्ण शुकशुकाट जाणवत आहे. एवढेच नव्हे तर रिक्षा, बसेसमध्येही तुलनेने कमी गर्दी दिसून येत आहे.
बुधवारच्या बाजारावरही उन्हाचा परिणाम दिसून आला. बाजारात विक्रेत्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटली. त्याचप्रमाणे दुपारी बाजारात पूर्णपणे शुकशुकाट जाणवत होता. यामुळे उलाढालही घटली. (प्रतिनिधी)