उन्हाळ्यात पोलीस कवायत मैदान झाली चौपाटी
By Admin | Updated: April 3, 2017 22:59 IST2017-04-03T22:58:48+5:302017-04-03T22:59:09+5:30
मालेगाव : संध्याकाळी बालगोपाळांची वाढतेय गर्दी; शीतपेयांसह घोडेस्वारीचा आनंद

उन्हाळ्यात पोलीस कवायत मैदान झाली चौपाटी
मालेगाव कॅम्प : मालेगाव शहरातील नागरिकांना विरंगुळा म्हणून चांगल्या व सुस्थितीमधील एकही उद्यान नाही. सुटीच्या कालावधीत शहरात एकही चांगले पर्यटनस्थळ नसल्याने शहरातील एकमेव पोलीस कवायत मैदान यासाठी सर्वांना पर्याय ठरले आहे. मैदानावर दररोज फेरफटका मारण्यासाठी शहरवासीयांची गर्दी वाढत आहे. यामुळे या मैदानाला मुंबई येथील चौपाटीसारखे स्वरुप प्राप्त झाले आहे.
शहराची पूर्व व पश्चिम भागातील लोकसंख्या दहा लाखांहून अधिक असल्याचे सर्वश्रृत आहे. त्यामानाने येथे अद्ययावत उद्याने असणे क्रमप्राप्त होते. महापालिकेत उद्यान विभागाची स्वतंत्र कामकाज चालते; परंतु अद्ययावत उद्यान तयार करण्याची महापालिकेची मानसिकता नाही. काही (ओपन स्पेस) मोकळ्या भूखंडांवर बगिचे विकसित केले आहेत. त्याचीही दुरवस्था झाली आहे. किदवाई रस्त्यावर सावित्रीबाई फुले हे एकमेव उद्यान शहरासाठी खुले आहे. या उद्यानात येण्यासाठी सर्व तयार नाही. कवायत मैदानासमोर पूर्वी त्रिकोणी बगिचा होता तो काही कारणास्तव नेस्तनाबूत करण्यात आला. त्यामुळे पूर्व व पश्चिम या दोन्ही भागातील नागरिकांसाठी पोलीस कवायत मैदान हेच पर्यटन केंद्र बनले आहे. येथे अद्यान, बागबगिचांसारखे फूलझाडे नसली तरी सायंकाळनंतर जोरात वाहणारा वारा सर्वांना सुखद अनुभव देतो. या मैदानावर दुपारनंतर लहान मुलांच्या मनोरंजनासाठी खेळणी व पन्नासहून अधिक विविध खाद्यपदार्थांच्या गाड्या सुरू होतात. या गाड्यांवर पावभाजी, भेळ, पाणीपुरीसह चायनिज, फूड, नॉनव्हेजसह आइस्क्रीम, शीतपेय, रसवंतीचीचा समावेश आहे. त्यामुळे मैदानाला चौपाटीचे स्वरुप आले आहे. खवय्यांसाठी ही एक पर्वणीच ठरते आहे. बच्चेकंपनीसाठी घोड्यावर बसून रपेट करण्यासाठी तीस घोड्यांची फौज येथे आहे.
चारचाकी गाडीचा आनंद घेण्यासाठी खास रिमोटवर चालणाऱ्या खेळण्यातील मोटारी या मैदानावर धावताना दिसतात. मैदानावर सकाळी व सायंकाळी वातावरण थंड व स्वच्छ असते. येथे दोन्ही वेळेस जॉगिंग व व्यायाम करणाऱ्यांची गर्दी होते. खासगी संस्था लहान-मोठ्या विद्यार्थ्यांना याच मैदानावर विविध खेळांचे प्रशिक्षण देतात. मैदानावर दर शुक्रवार ते रविवार या तीन दिवसांमध्ये प्रचंड गर्दी होते. येथे क्रिकेट, व्हॉलिबॉलसह इतर खेळ खेळले जातात. यामुळे पोलीस प्रशासनातर्फे येथे जादा बंदोबस्त तैनात करण्यात येतो. शहरात
एकही अद्ययावत उद्यान नसल्याने पोलीस कवायत मैदान दिवसातील काहीवेळ घालवण्याचे एक हक्काचे ठिकाण झाल्याचे दिसून येते. (वार्ताहर)