नाशिककरांना उन्हाळा तापदायक : तपमानाची चाळीशी
By Admin | Updated: April 3, 2017 15:16 IST2017-04-03T14:32:05+5:302017-04-03T15:16:08+5:30
यावर्षीचा उन्हाळा नाशिककरांना चांगलाच तापदायक ठरत आहे. कारण दीड दशकानंतर नाशिककरांनी प्रथमच मार्च महिन्यातच तपमानाची चाळीशी अनुभवली.

नाशिककरांना उन्हाळा तापदायक : तपमानाची चाळीशी
नाशिक आॅनलाइन लोकमत : यावर्षीचा उन्हाळा नाशिककरांना चांगलाच तापदायक ठरत आहे. कारण दीड दशकानंतर नाशिककरांनी प्रथमच मार्च महिन्यातच तपमानाची चाळीशी अनुभवली. त्यामुळे आता एप्रिल व पुढच्या मे महिन्यामध्ये वाढणाऱ्या उन्हाच्या तीव्रतेची चिंत थंड वातावरणाच्या शहरात राहणाऱ्या नाशिककरांनही सतावत आहेत. हंगामातील सर्वाधिक ४०.३ इतका तपमानाचा उच्चांक अद्याप नोंदविला गेला आहे.
शहराच्या कमाल तपमानात २३मार्चपासून सातत्याने वाढ होत होती. तपमानाचा पारा ३८अंशाच्या वर सरकत होता. २९ मार्चपर्यंत तपमान ४०.३ अंशापर्यंत पोहचल्याने नाशिककरांना उष्म्याचा त्रास सहन करावा लागला. यावर्षी हवामान खात्यालादेखील मार्चमध्येत तपमानाने गाठलेल्या चाळीशीचा धक्का बसला. येथील पेठरोडवर असलेल्या हवामान खात्याच्या कार्यालयात हंगामातील सर्वाधिक तपमानाची नोंद २६मार्च रोजी तपमानाने चाळीशी गाठली आणि ४०.१ इतक्या तपमानाची नोंद झाली. त्यानंतर सलग तीन दिवस शहरत ४०.३ इतके कमाल तपमान कायम होते. हवामान खात्याने शहरवासियांनी उष्णतेची लाट आल्याचा इशाराही दिला होता. उष्माघाताचा धोका लक्षात घेता नागरिकांनी घ्यावयाची दक्षता याबाबत सोशल मिडियापासून तर प्रशासनापर्यंत सर्वांकडूनच उपाययोजनांचा जागर केला जात होता. दीड दशकानंतर यंदा मार्च महिन्यातच अचानकपणे पारा चाळीशीपार का गेला? याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहे. वाढत्या तपमानामुळे शहराचे हवामान बदलले असून एकेकाळी थंड वातावरणाचे शहर असा नावलौकिक मिरविणाऱ्या नाशिकमध्येही ऊन तापू लागले आहे. यामुळे भविष्याच्या दृष्टीने नाशिककरांसाठी ही चिंतेची बाब ठरणार आहे.
२०१०चा रेकॉर्ड मोडणार ?
दीड दशकानंतर मार्च महिन्यात तपमानाने चाळीशी ओलांडली. दरम्यान, दोन दिवसांपासून पुन्हा शहरातील डेरेदार हिरवीगार वृक्षांवर कुऱ्हाड चालविण्यास सुरूवात झाल्याने या एप्रिलमध्ये २०१० सालाचा रेकॉर्ड मोडण्याची भीती नाशिककरांना वाटू लागली आहे. २०१०साली एप्रिलमध्ये सर्वाधिक ४२.२ इतके कमाल तपमान नोंदविले गेले होते. सात वर्षांमधील हा सर्वाधिक उच्चांक आहे. अद्याप ४२.२च्या नोंदीचा विक्रम मोडलेला नाही; मात्र या वर्षी मार्चमधील उन्हाळ्याची तीव्रता बघता एप्रिलच्या अखेरपर्यंत तपमानाचा पारा ४२ अंशापर्यंत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.