विम्याच्या रकमेसाठी त्याने रचला स्वत:च्याच मृत्यूचा बनाव!

By Admin | Updated: June 28, 2017 00:49 IST2017-06-28T00:48:51+5:302017-06-28T00:49:09+5:30

नाशिक : अपघाती मृत्यूनंतर मिळणाऱ्या विम्याच्या चार कोटी रुपयांसाठी एकाने तीन साथीदारांच्या मदतीने स्वत:च्या मृत्यूचा बनाव रचला

For the sum insured, he made his own death! | विम्याच्या रकमेसाठी त्याने रचला स्वत:च्याच मृत्यूचा बनाव!

विम्याच्या रकमेसाठी त्याने रचला स्वत:च्याच मृत्यूचा बनाव!

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : अपघाती मृत्यूनंतर मिळणाऱ्या विम्याच्या चार कोटी रुपयांसाठी एकाने तीन साथीदारांच्या मदतीने स्वत:च्या मृत्यूचा बनाव रचला खरा; मात्र शवविच्छेदन अहवाल आणि चाणाक्ष ग्रामीण पोलिसांच्या तपासामुळे त्याचा हा बनाव उघडकीस आला आहे़ या चौघा संशयितांनी मृतदेहासाठी एका हॉटेल कर्मचाऱ्याचा खून करून त्याचा मृतदेह त्र्यंबकेश्वर रोडवरील अंबाई शिवारातील तोरंगण घाटात ठेवून अपघाताचा बनाव रचला होता़ ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणातील तिघा संशयिताना अटक केली असून, प्रमुख संशयित फरार झाला आहे़
जव्हार - त्र्यंबकेश्वर रोडवरील तोरंगण घाटात संरक्षण भिंतीजवळ
९ जून रोजी मृतदेह आढळून आला होता. अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याचा संशय पोलिसांनी वर्तविला होता़ तसेच या मृतदेहाच्या कपड्यांची तपासणी केल्यानंतर त्यात एचडीएफसी व महिंद्रा कोटक बँकेचे एटीएम कार्ड आणि लाईट बिल आढळून आले. तसेच एमएच १५ डीटी ८५३ क्रमांकाची सीबीझेड एक्स्ट्रिम दुचाकीही आढळून आली होती़ या कागदपत्रांवरून रामदास पुंडलिक वाघ (३९, रा. तांगडी शिवार, ता. चांदवड) यांचा हा मृतदेह असल्याचे समोर आले़
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदनानंतर दिलेल्या अहवालात गळा आवळून तसेच डोक्यात, तोंडावर टणक हत्याराने वार केल्याने वाघ यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले व त्यानुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला़ ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने तांगडी येथील रहिवासी रामदास वाघ यांची माहिती घेण्यास सुरुवात केली असता तो वादग्रस्त जमिनींची खरेदी - विक्रीचा व्यवसाय करीत असल्याचे समोर आले़ तसेच गतवर्षी त्याने विविध कंपन्यांचा चार कोटी रुपयांचे विमा काढल्याचेही समोर आले़ पोलिसांनी रामदास वाघचा मित्र सतीश खंडेराव गुरगुडे (३१) यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता वाघ याने विम्याच्या चार कोटी रुपयांसाठी स्वत:च्या अपघाताची मृत्यूचा बनाव रचल्याची माहिती दिली़ या प्रकरणाचा सखोल तपासानंतर श्रावण वेडू वांजुळे (५०) व सागर श्रावण वांजुळे (२०, दोघे रा. शिरुर तांगडी) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत मुख्य संशयित रामदास वाघ व तिघांनी तांगडी शिवारातील महाराणा हॉटेलमध्ये काम करणाऱ्या अण्णा नावाच्या परप्रांतीय कर्मचाऱ्याचा खून करून त्याचा मृतदेहावरून गाडीचे चाक चालवून चेहरा विद्रूप केला. त्यानंतर त्याचा मृतदेह त्र्यंबकेश्वर येथे टाकून फरार झाले़


याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी वांजुळे पिता पुत्रांसह सतीष गुरगुडे यास अटक केली आहे. तर मुख्य आरोपी रामदास वाघ हा फरार असून त्याच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.





खुनापूर्वी अण्णास चांगले जेवण






महाराणा हॉटेलमध्ये काम करणाऱ्या अण्णास संशयितांनी खुनाच्या दोन दिवस अगोदरच हॉटेलमधून गोड गोड बोलून सोबत नेले. यानंतर सागर वांजुळे याने अण्णास दोन दिवस चांदवड-देवळा रोडवरील एका हॉटेलमध्ये तसेच देवळा तालुक्यातील निताणे येथील नातेवाइकाच्या घरी ठेवले व त्याचा पाहुणचारही केला. ९ जून रोजी अण्णाला रामदास वाघचे कपडे घालण्यास दिले. यानंतर रामदासच्या कारमध्ये बसवून त्र्यंबकेश्वर-जव्हार रोडवरील अंबाई घाटात घेऊन गेले. या ठिकाणी गुंगीचे औषध व दारू पाजून कारमधील सीटबेल्टनेच अण्णाचा गळा आवळून खून केला. त्यानंतर अण्णाच्या कपड्यांमध्ये एटीएम कार्ड व लाईट बिल ठेवून मृतदेहावरून कार चालवून चेहरा विद्रूप केला. तो मृतदेह रामदास वाघ याचाच असल्याचा बनाव रचला. दरम्यान, खून झालेला अण्णा हा तामिळनाडूतील सालेम येथील मुबारक चॉंद पाशा असल्याचेही तपासात समोर आले आहे.




विम्याच्या रकमेत प्रत्येकाचा हिस्सा
च्रामदास वाघ याने चार कोटी रुपये विम्याची रक्कम मिळाल्यानंतर प्रत्येकाला त्यांचा हिस्सा देण्याचे कबुल केले होते़ साथीदार सतीष गुरगुडे याला विम्याची रक्कम मिळवून देण्यासाठी ५० लाख रुपये दिले जाणार होते़ सतीषनेच घटनेच्या दिवशी रामदास वाघ याची दुचाकी श्रावण वांजुळे याच्याकडे पोहचवली. श्रावण वांजुळे याला खूनाच्या गुन्ह्यात मदतीसाठी रामदास वाघ हा विम्यातील आणखी काही रक्कम तसेच मुलीच्या लग्नासाठी उसनवार घेतलेले तीन लाख रु पये माफ व जेसीबीचे कर्जही फेडणार होता. सागर वांजुळे यास माहिती असूनही त्याने अण्णास दोन दिवस पाहूणचार केल्याबद्दल काही रक्कम मिळणार होती़

Web Title: For the sum insured, he made his own death!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.