दोन शेतकऱ्यांच्या जिल्ह्यात आत्महत्त्या
By Admin | Updated: June 28, 2016 01:06 IST2016-06-28T00:30:55+5:302016-06-28T01:06:06+5:30
दोन शेतकऱ्यांच्या जिल्ह्यात आत्महत्त्या

दोन शेतकऱ्यांच्या जिल्ह्यात आत्महत्त्या
नाशिक : जिल्ह्यात शेतकरी आत्महत्त्येच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून, सोमवारी पुन्हा त्र्यंबक व निफाड तालुक्यांतील दोघा शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. चालू वर्षी आत्महत्त्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ५२ वर पोहोचली असून, या वाढत्या घटनांनी प्रशासन चिंतित सापडले आहे.
दशरथ त्र्यंबक भोये (४२) व शांताराम नथू वाजे (६०) असे या दोघांची नावे आहेत. भोये हे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दलपतपूर येथील रहिवासी असून, त्यांच्या नावे दोन एकर जमीन आहे. नापिकी व आर्थिक विवंचनेतून २२ जून रोजी घरातच गळफास घेऊन त्यांनी आत्महत्त्या केली. दोन दिवसांनी त्यांच्या कुटुंबीयांनी प्रशासनाला याची माहिती दिली. तहसीलदारांनी त्यांच्या घरी भेट दिली असता, प्रथम दर्शनी कर्जबाजारीपणाला कंटाळूनच त्यांनी आत्महत्त्या केल्याचे सांगण्यात आले. दुसरी घटना निफाड तालुक्यातील श्रीरामपूर येथे घडली शांताराम वाजे यांनी मध्यरात्री राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्त्या केली. वाजे यांच्या स्वत:च्या नावावर शेतजमीन नसली तरी, पत्नी रेखाबाई हिच्या नावावर ६२ आर इतकी जमीन आहे. दरम्यान, जिल्ह्यात आत्महत्त्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या सहा महिन्यांत ५२ इतकी झाली असून, दरमहिन्याला सरासरी सहा ते सात शेतकरी आत्महत्त्या करू लागल्याने प्रशासन चिंतित सापडले आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या रोखण्यासाठी गावपातळीवर समुपदेशन शिबिरे घेतली जात आहेत. (प्रतिनिधी)