मुखेड येथील शेतकºयाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 01:07 IST2017-08-23T01:07:09+5:302017-08-23T01:07:15+5:30
येथील शेतकरी रफीक तांबोळी (४०) याने शेती व जोड-व्यवसायातील झालेल्या तोट्यामुळे जीवनाला कंटाळून आत्महत्या केली.

मुखेड येथील शेतकºयाची आत्महत्या
मुखेड : येथील शेतकरी रफीक तांबोळी (४०) याने शेती व जोड-व्यवसायातील झालेल्या तोट्यामुळे जीवनाला कंटाळून आत्महत्या केली. अवघी एक एकर शेतजमीन वाट्याला आलेली. लहरी पाऊस सातत्याने कोसळणारे बाजारभाव यामुळे शेतीत फक्त तोटाच येत गेला. शेतीला जोडव्यवसाय म्हणून त्याने काही वर्षापासून पिठाच्या गिरणीचा व्यवसाय सुरु केला. या दोन्हीतून कशीबशी रोजीरोटी सुरु झाली. मात्र गेल्या तीन महीन्यांपासून येथील वीज वितरण कंपनीने वीजपुरवठ्याचा शेतात तसेच गावातही पुरता खेळखंडोबा केल्याने रफीकची रोजीरोटी हिरावली गेली. पिठाची गिरणी ३ महीन्यापासून बंद आहे. वीजपुरवठा पूर्ववत व्हावा यासाठी त्याने सर्व प्रयत्न केले. मात्र त्याचा आवाज कोणत्याही अधिकारी व कर्मचाºयाने ऐकला नाही. साठवलेली थोडीफार रक्कम संपल्याने त्यांनी मित्र, नातेवाईक यांच्याकडून उसनवारी केली. तीही संपुष्टात आल्यावर हादरलेल्या शेख ने आजारी पत्नी, दोन मुलांपैकी एक मुलगा दिव्यांग यांच्या पोटाचा प्रश्न निर्माण झाल्याने हताश होत आत्महत्येचा मार्ग निवडला. या घटनेने संतप्त ग्रामस्थांनी येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर मूक मोर्चा काढून संबधित अभियंत्याला निवेदन देण्याचा प्रयत्न केला. मात्र तब्येत बरोबर नसल्याचे कारण सांगून या अभियंत्याने कार्यालयात येणार नसल्याचे सांगितले.