पत्नीचा खून करून पतीची रेल्वेखाली आत्महत्त्या
By Admin | Updated: February 27, 2017 01:00 IST2017-02-27T00:59:56+5:302017-02-27T01:00:09+5:30
चांदवड : तालुक्यातील काळखोडे येथे चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करून नंतर पतीने रेल्वेखाली जाऊन आत्महत्त्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

पत्नीचा खून करून पतीची रेल्वेखाली आत्महत्त्या
चांदवड : तालुक्यातील काळखोडे येथे चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करून नंतर पतीने रेल्वेखाली जाऊन आत्महत्त्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याप्रकरणी चांदवड पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल झाला असून, खून करणारा संशयित मयत झाला आहे. काळखोडे येथे दि. २६ फेब्रुवारी रोजी फुलाबाई आनंदा माळी ( ३५) ही महिला मृतावस्थेत आढळल्याची खबर पोलीस पाटील हर्षाली दत्तू शेळके यांनी चांदवड पोलीस स्टेशनला दिली. या घटनेचे वृत्त समजताच चांदवडचे पोलीस निरीक्षक अनंत मोहिते यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. काळखोडे येथे त्यांना घटनास्थळी फुलाबाई आनंदा माळी (३५) ही मृतावस्थेत आढळली. तिच्या मृतदेहाजवळच मोठा लोखंडी गज पडलेला दिसला. यावरून या सळईनेच हा खून झाल्याचे प्रथमदर्शनी अंदाज व्यक्त करण्यात आला. घरात पती नसल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवायला प्रारंभ केला. सदर घटना मध्यरात्री ते पहाटे सहा वाजेपर्यंत केव्हातरी घडल्याची माहिती त्यांची तिन्ही मुले सांगत होते. तपास सुरू असतानाच थोड्याच वेळात माहिती मिळाली की, पती आनंदा बारकू माळी (४०) याचाही काळखोडे रेल्वे गेटजवळ मृतदेह आढळला आहे. त्यानेही रेल्वेखाली जीव दिला असल्याचे समोर आले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी आपली तपासाची चक्रे फिरविली. फुलाबाईचा पती आनंदा बारकू माळी हा मुळचा धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील खरडबारी येथील रहिवासी होता. तो बऱ्याच दिवसांपासून काळखोडे या सासुरवाडीच्या ठिकाणी मोलमजुरी करीत होता. त्याची पत्नी फुलाबाई हिचे माहेर काळखोडे येथीलच असून तिचे भाऊदेखील काळखोडे येथे गावातच राहतात. फुलाबाई हिच्यावर आनंदा माळी चारित्र्याचा नेहमीच संशय घेत होता. यावरून तो तिला मारझोड करीत असल्याचे त्याचे दोन्ही लहान भाऊ सोमा व गोमा यांनी पोलिसांना सांगितले. दि. २६ रोजी मध्यरात्री आनंदा याने फुलाबाईचा लोखंडी गजाने खून केला. ती रक्ताच्या थारोळ्यात पडली असता आनंदा माळी यानेही रेल्वे गेट क्रमांक २४१ च्या रेल्वेलाइनवर जाऊन जीव दिला. या दोघांच्या निधनाची बातमी परिसरात पसरल्यानंतर घटना बघण्यासाठी बघ्याची गर्दी जमली होती. संपूर्ण माळी परिवारावर शोककळा पसरली. फुलाबाई हिचे माहेर गावात काळखोडे येथे असून, वृद्ध आई अंजनाबाई सखाराम सोनवणे आपल्या दोन मुलांसह तेथेच राहते. तिचा एक मुलगा रायपूरला राहतो. पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला आहे. उपनिरीक्षक कैलास चौधरी, नरेंद्र संैदाणे, व्ही. बी. पवार, जी. आर. निमेकर, चंद्रकांत निकम, मंगेश डोंगरे, बापू चव्हाण, शिवाजी कुशारे आदि पुढील तपास करीत आहेत. (वार्ताहर)
आनंदा माळी, फुलाबाई माळी यांना लक्ष्मण (१३), लखन (११), पूनम (९ वर्षे) अशी तीन अपत्ये आहेत. हे तिघेही रात्री घराबाहेरच झोपले होते. सकाळी सहा वाजता तिघेही उठून घरात बघतात तर आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली त्यांना आढळली. त्यांनी मामा खंडू, पांडू, समाधान व काका सोमा, गोमा यांना बोलाविले.