दोन तरुण शेतकऱ्यांची आत्महत्या

By Admin | Updated: April 18, 2017 00:49 IST2017-04-18T00:48:57+5:302017-04-18T00:49:14+5:30

दोन तरुण शेतकऱ्यांची आत्महत्या

Suicide of Two Young Farmers | दोन तरुण शेतकऱ्यांची आत्महत्या

दोन तरुण शेतकऱ्यांची आत्महत्या

मालेगाव : सततची नापिकी व कर्जबाजारीपणामुळे वैफल्यग्रस्त बनलेल्या तालुक्यातील दोघा अविवाहित तरुण शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. तालुक्यातील वाके येथील दिनेश शांताराम सावंत (२४) या शेतकऱ्याने शेततळ्यात उडी घेऊन, तर निंबायती येथील राकेश प्रकाश शेवाळे (२१) या शेतकऱ्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तालुक्यातील वाके येथील दिनेश सावंत या तरुण शेतकऱ्याच्या वडिलांच्या नावावर पावणेदोन एकर क्षेत्र आहे. त्यांनी सध्या शेतात मका व कांद्याची लागवड केली आहे. सततची नापीकी व उत्पादनात झालेली घट यामुळे महाराष्ट्र बॅँक शाखेचे ८० हजार रुपये कर्जाची परतफेड कशी करावी, या विवंचनेतुन दिनेश सावंत याने आज सोमवारी त्यांच्या शेजारील श्रीमती नंदाबाई राजाराम निकम यांच्या मालकीच्या शेततळ्यात उडी मारुन आत्महत्या केली. सावंत यांच्याकडे सामाईक विहिर आहे. दिनेश याच्या पश्चात वडील शांताराम व आई विठाबाई असा परिवार आहे. याप्रकरणी वाके येथील तलाठ्याने पंचनामा करुन तसा अहवाल येथील तहसिल कार्यालयाला सादर केला आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.
दरम्यान दुसऱ्या घटनेत तालुक्यातील निंबायती येथील राकेश प्रकाश शेवाळे (२१) या तरुण शेतकऱ्याने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्याचे वडील प्रकाश पांडूरंग शेवाळे यांच्या नावे निंबायतीला गट क्रमांक ३३/२ अ/२ ८० आर क्षेत्र आहे. त्यांच्यावर निंबायती विविध कार्यकारी सोसायटीचे ६० हजार रुपये कर्ज आहे. या कर्जाची परतफेड कशी करायची या विवंचनेतुन आलेल्या नैराश्यातुन राकेश शेवाळे याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी निंबायती तलाठ्याने पंचनामा करुन तसा अहवाल येथील तहसिल कार्यालयाला सादर केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Suicide of Two Young Farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.