गुंतवणूक कंपनीच्या एजंटची आईसह आत्महत्त्या

By Admin | Updated: July 15, 2014 09:05 IST2014-07-14T22:48:58+5:302014-07-15T09:05:30+5:30

केबीसी मल्टिट्रेड प्रा़ लिमिटेडमध्ये एजंटचे काम करणारा सागर निकम व त्याची आई पुष्पलता निकम यांनी रविवारी रात्री विषारी औषध प्राशन करून आत्महत्त्या केली़

Suicide with the mother of an investment company's agent | गुंतवणूक कंपनीच्या एजंटची आईसह आत्महत्त्या

गुंतवणूक कंपनीच्या एजंटची आईसह आत्महत्त्या

नाशिक : जिल्ह्यासह मराठवाड्यातील गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुंबई-आग्रा महामार्गावरील केबीसी मल्टिट्रेड प्रा़ लिमिटेडमध्ये एजंटचे काम करणारा सागर निकम व त्याची आई पुष्पलता निकम यांनी रविवारी रात्री विषारी औषध प्राशन करून आत्महत्त्या केली़ पुष्पलता निकम या जिल्हा रुग्णालयात परिचारिका, तर मुलगा केबीसीचा एजंट म्हणून काम करीत होता़ आत्महत्त्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत केबीसीत गुंतवणूक केलेली रक्कम परत मिळत नसल्याने आत्महत्त्या करीत असल्याचे लिहिण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले़ या प्रकरणी प्रथम अकस्मात मृत्यू तर केबीसी संचालकांवर आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
जिल्हा रुग्णालयातील मनोरुग्ण विभागात परिचारिका म्हणून काम करणाऱ्या पुष्पलता पोपट निकम (५५), मुलगा सागर पोपट निकम (२६) (दोघे रा़ कुंभारवाडा,माउली किराणा दुकानासमोर, काझीगढी, जुने नाशिक) हा केबीसीमध्ये एजंटचे काम करीत होता़ मुलाच्या सांगण्यावरून पुष्पलता निकम यांनी रुग्णालयातील सहकारी परिचारिकांना केबीसीची गुंतवणूक योजनेची माहिती दिली़ त्यानुसार अनेक परिचारिकांनी केबीसीमध्ये गुंतवणूक केलेली आहे़ त्यातच केबीसीचे संचालक भाऊसाहेब छबू चव्हाण, आरती भाऊसाहेब चव्हाण, बापू छबू चव्हाण हे सिंगापूरला पळून गेल्याचे, तसेच कंपनीने गाशा गुंडाळल्याच्या बातम्या सुरू होत्या़
केबीसीमध्ये आपल्यामार्फ त गुंतवणूक केलेले गुंतवणूकदार आता पैशासाठी मागे लागतील, या भीतीने पुष्पलता व सागर निकम यांनी रविवारी रात्री विषारी औषध प्राशन केले़ सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला़ या दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले़ याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात प्रथम अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस हवालदार पाटीलअधिक तपास करीत आहेत़ दरम्यान, आत्महत्त्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीनुसार केबीसी संचालकांविरोधात आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे़(प्रतिनिधी)

Web Title: Suicide with the mother of an investment company's agent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.