प्रेमीयुगुलाची विष पिऊन आत्महत्त्या
By Admin | Updated: December 7, 2015 23:09 IST2015-12-07T23:08:28+5:302015-12-07T23:09:30+5:30
प्रेमीयुगुलाची विष पिऊन आत्महत्त्या

प्रेमीयुगुलाची विष पिऊन आत्महत्त्या
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील अंबई येथील एका प्रेमीयुगुलाने विष प्राशन करून आत्महत्त्या केली. आत्महत्त्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे. सोमवारी सकाळी ७ वाजेच्या अगोदर हा प्रकार घडला असावा, असे पोलीस सूत्रांकडून कळते.
अंबईजवळील नागाचा सोंडा (लग्नस्तंभ) येथील डोंगरावर ही घटना घडली. प्रेमीयुगुलाने विष प्राशन करून आत्महत्त्या केली असल्याचे शवविच्छेदन अहवालात म्हटले असल्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक गणेश परदेशी यांनी सांगितले. मृत तरुणाचे नाव राहुल पंढरी भालेराव, रा. अंबई (२६), तर मयत तरुणीचे नाव काळाबाई भिवा लचके (२३), रा. अंबई (ता. त्र्यंबक) असे आहे. मृत राहुलचा विवाह झाला होता; मात्र पत्नी त्याच्याजवळ राहत नसल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे, विषाची बाटली अगर अन्य काही पुरावा घटना स्थळी आढळून आला नाही. याबाबतचा अधिक तपास पोलीस निरीक्षक देवीदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक गणेश परदेशी, राजू दिवटे, दोंडे, आवारे करीत आहेत.
दरम्यान, या प्रकरणाची खबर सोमवारी मेटघेरा किल्ला येथील पोलीसपाटील किसन तुकाराम झोले यांनी त्र्यंबक पोलीस ठाण्यात दिली. या आत्महत्त्येमुळे तर्कवितर्क काढले जात होते. (वार्ताहर)
नांदूर शिवारात बेवारस मृतदेह
येवला : तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत सोमवारी (दि. ७) नगर-मनमाड रेल्वेलाईनजवळ नांदूर शिवारात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला.
रेल्वेलाईन किलोमीटर ४८५/२/३ जवळ नांदूर गावाच्या शिवारात अंदाजे ४५ वर्ष वयाच्या पुरुषाचा मृतदेह सापडला. अंगात सफेद, राखाडी काळे उभ्या पट्ट्याचा शर्ट, राखाडी रंगाची पॅन्ट असून, उजव्या हातावर मराठीत बापू असे नाव गोंदलेले आहे. या व्यक्तीविषयी कोणालाही माहिती असल्यास त्यांनी येवला तालुका पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक रु पचंद वाघमारे यांनी केले आहे. (वार्ताहर)