एक लाख वीस हजार मेट्रिक टन उसाचे गाळप
By Admin | Updated: January 31, 2017 01:44 IST2017-01-31T01:44:39+5:302017-01-31T01:44:56+5:30
कादवा : ऊस लागवड करण्याचे आवाहन

एक लाख वीस हजार मेट्रिक टन उसाचे गाळप
दिंडोरी : यंदा दुष्काळी स्थितीमुळे उसाची उपलब्धता कमी असतानाही जिल्ह्यातील ऊस उत्पादकांनी ‘कादवा’वर विश्वास ठेवत ऊस पुरविल्यामुळे कादवाने एक लाख वीस हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून, कादवा जास्तीत जास्त उसाला भाव देण्यासाठी कटिबद्ध आहे. शेतकऱ्यांनी उसाची जास्तीत जास्त लागवड करावी, असे आवाहन कादवाचे विद्यमान चेअरमन श्रीराम शेटे यांनी केले आहे. कादवा सहकारी साखर कारखान्याच्या गळीप हंगामाच्या सांगतेप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शेतकऱ्यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. कादवाने ७९ दिवसांच्या गळीत हंगामात एक लाख वीस हजार मे. टन उसाचे गाळप झाले असून, सरासरी १०.५० टक्केच्या साखर उताऱ्यानुसार एक लाख चोवीस हजार ५०० पोती साखरेची निर्मिती झाली आहे.
पुढे बोलताना शेटे यांनी गळीत हंगाम यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल सर्व सभासद, ऊस उत्पादक, कारखान्याचे अधिकारी, कामगार, ऊसतोड कामगार, वाहतूकदार यांचे आभार मानले. इतर पिकांचे भाव शाश्वत नसताना उसाची एफआरपी निश्चित असल्याने शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त उसाची लागवड करावी, असे आवाहन श्रीराम शेटे यांनी केले. यावेळी व्हा. चेअरमन उत्तमबाबा भालेराव यांच्यासह सर्व संचालक, सभासद, ऊस उत्पादक, अधिकारी व कामगार उपस्थित होते. (वार्ताहर)