नामसाधर्म्याचा असाही फटका
By Admin | Updated: August 27, 2016 00:04 IST2016-08-27T00:04:37+5:302016-08-27T00:04:54+5:30
यंत्रणेची धावपळ : अक्राळेचा तलाव फुटल्याची अफवा

नामसाधर्म्याचा असाही फटका
नाशिक : सोशल माध्यमातून प्रसृत होणाऱ्या पोस्ट खऱ्या असतातच असे नाही. कधी कधी त्या गैरसमजातूनही व्हायरल केल्या जातात, तर कधी कधी त्या पोस्ट महत्त्वाच्याही ठरतात. शासकीय यंत्रणेला मात्र असा सर्वच प्रकारच्या माहितीची दखल घ्यावी लागते, त्यातून भलेही मनस्ताप का सहन करावा लागो. असाच प्रकार निव्वळ नामसाधर्म्यातून घडला. पाझर तलाव फुटल्याची मध्यरात्री पोस्ट व्हायरल होताच, यंत्रणेची प्रचंड धावपळ उडाली, अखेर हा सारा प्रकार चुकीच्या माहितीच्या आधारे प्रसृत झाल्याचे स्पष्ट होताच, सर्वांना हायसे वाटले.
गुरुवारी मध्यरात्री दीड वाजता नंदुरबारचे प्रांत अधिकारी सुनील गाढे यांना सोशल माध्यमातून व्हॉट््स अॅपवर संदेश मिळाला. ‘अक्राळे येथील पाझर तलावातून पाणी गळती सुरू झाली असून, तलाव फुटून पाणी वाया जाण्याची शक्यता आहे’ असा तो संदेश होता. नंदुरबार उपविभागातील दुर्गम भागात अक्राळे गाव असून, तेथे पाझर तलाव असल्याने सोशल माध्यमातून प्राप्त झालेल्या संदेशाच्या आधारे गाढे यांनी तत्काळ आपत्ती व्यवस्थापन कक्षाला अवगत करतानाच, समन्वयाच्या माध्यमातून तत्काळ पथके तयारीनिशी आक्राळेकडे रवाना केली. मध्यरात्रीपासून सुरू झालेली ही धावपळ पहाटेपर्यंत सुरूच होती. प्रत्यक्ष अक्राळेच्या तलावाला भेट दिल्यावर तो सुस्थितीत असल्याचा व त्यात जेमतेम पाणी साठल्याचे पाहून अधिकाऱ्यांचा जीव भांड्यात पडला. या घटनेनंतर प्रांत सुनील गाढे यांनी ज्या व्यक्तीने त्यांना संदेश पाठविला, त्याच्याशी संपर्क साधला असता, त्याने आपल्यालाही अन्य व्यक्तीकडून तो संदेश प्राप्त झाल्याचे व चांगल्या हेतूने तो पाठविल्याचे स्पष्टीकरण दिले. ती व्यक्ती दिंडोरी येथील देशमुख नामक असल्याने गाढे यांनी समयसूचकता दाखवून दिंडोरीचे तहसीलदार बाबासाहेब गाढवे यांच्याशी संपर्क साधून खातरजमा करण्याची सूचना केली.
त्यावर तत्काळ त्यांनीही यंत्रणा पाठविली व तालुक्यातील अक्राळे येथे जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे खात्याने बांधलेल्या पाझर तलावाची पाहणी करण्यात आली. (प्रतिनिधी)