शिवसेनेच्या डावपेचांना यश
By Admin | Updated: February 25, 2017 00:23 IST2017-02-25T00:23:29+5:302017-02-25T00:23:44+5:30
समीकरणे बदलली : राष्ट्रवादी कॉँग्रेसला धोबीपछाड

शिवसेनेच्या डावपेचांना यश
भगवान गायकवाड : दिंडोरी
गेल्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा मिळविलेल्या यशाने हुरळून गेलेल्या राष्ट्रवादीच्या अतीआत्मविश्वासाचा फुगा कॉंग्रेस शिवसेनेच्या माजी आमदारांनी डावपेच आखत फोडून टाकत राष्ट्रवादीला जिल्हा परिषदेतून हद्दपार करत पुन्हा आपापल्या भागात आपली ताकद स्पष्ट करत राष्ट्रवादीला धोबीपछाड दिला आहे . कॉंग्रेस सेनेच्या विजयी रथाला खीळ घालू पाहणार्या भाजपावरही कपाळमोक्ष करण्याची वेळ आली आहे. शिवसेना कॉंग्रेसच्या या यशाने राष्ट्रवादीवर आत्मपरीक्षणाची वेळ आली आहे .शिवसेनेला जरी अभूतपूर्व यश मिळाले असले तरी तिकीट वाटपाच्या कथित डावपेचातून नाराज झालेले सैनिक भाजपवासी झाल्याने मित्रपक्ष भाजपला कार्यकर्त्यांची फळी मिळाल्याने संघटन वाढविण्याची संधी मिळाली आहे .
दिंडोरी तालुक्यात २००७ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीने सर्वच्या सर्व जिल्हा परिषेदेच्या जागा मिळवत आपले वर्चस्व मिळवले परंतु याच निवडणुकीच्या निमित्ताने पंचायत समितीत धनराज महाले यांना उमेदवारी न देण्याची चूक भोवत तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलली. माजी खासदारपुत्र धनराज महाले यांच्या रूपाने एक मोहरा शिवसेनेला मिळाल्याने शिवसेनेचे मनसुबे वाढले. त्यातच माजी आमदार रामदास चारोस्कर हेही उमेदवारी न मिळाल्याने २००९ च्या निवडणुकीत त्यांचा आशीर्वाद शिवसेनेला मिळाल्याने महाले आमदार झाले. पुढे गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत चारोस्कर व सेनेचे पुन्हा बिनसले व त्यांच्या तटस्थ भूमिकेने सेनेला राष्ट्रवादीला रोखत जिल्हा परिषदेत जाण्याची संधी मिळाली .तर गेल्या निवडणुकीत चारोस्कर यांनी स्वगृही कॉंग्रेसमध्ये परतत नशीब आजमावले पण राष्ट्रवादीचे नरहरी झिरवाळ निवडून आले . झिरवाळ यांच्या यशाने राष्ट्रवादी काहीशी हुरळून गेली. कॉंग्रेस सेना भाजपाच्या मतविभागणीचा फायदा घेवून पुन्हा यश मिळवू असा आत्मविश्वास राष्ट्रवादीला होता. मात्र शिवसेनेचे माजी आमदार धनराज महाले यांच्या रणनीतीने राष्ट्रवादीचे मनसुभे धुळीस मिळवले महाले यांनी खेडगावमधून तर माजी आमदार रामदास चारोस्कर यांच्या पत्नी सुनिता चारोस्कर यांनी उमराळे येथून उमेदवारी करत राष्ट्रवादीच्या आव्हानाला प्रतिआव्हान दिले . रामदास चारोस्कर यांनी विधानसभेला मिळविलेल्या मतांच्या आडाख्यावर मोहाडी, उमराळे कोचरगाव गटावर लक्ष केंद्रित केले. मात्र अखेरच्या क्षणी उमराळे व कोचरगाव गटावर लक्ष केंद्रित करत यश मिळविले तर धनराज महाले लढत असलेल्या खेडगाव गटात उमेदवाराला एबी फॉर्म न देत राष्ट्रवादीला खिंडीत खिळून ठेवण्याचे डावपेच आखले . त्यातच शिवसेनेने गेल्या वेळी कोचरगाव गटात निसटत्या पराभवाचा बदला घेण्याची संधी असताना आपल्या प्रबळ दावेदारांऐवजी नवख्या उमेदवारांना दिलेली उमेदवारीने कॉंग्रेस सेनेत अंतर्गत सेटिंग झाल्याची चर्चा रंगली आहे.