सरदवाडी शाळेचा अहवाल जिल्हा परिषदेकडे सादर
By Admin | Updated: November 24, 2015 22:06 IST2015-11-24T22:05:50+5:302015-11-24T22:06:49+5:30
बेशिस्त : शाळेतील शिक्षकांमध्ये विसंवाद; ग्रामस्थांकडून शाळेस कुलूप

सरदवाडी शाळेचा अहवाल जिल्हा परिषदेकडे सादर
सरदवाडी : सिन्नर तालुक्यातील सरदवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील गैरप्रकार व शिक्षक बदली प्रकरणी गटशिक्षणाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे अहवाल पाठविला आहे.
सरदवाडी शाळेतील शिक्षकांमध्ये विसंवाद आहे. आतापर्यंत तीन वेळा शाळेत तोडफोड करून शासकीय मालमत्तेची हानी करण्यासह फळ्यावर शिक्षिकेविषयी अश्लील मजकूर लिहिण्याचे प्रकार घडले आहेत. यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी सोमवारी शाळेस कुलूप ठोकत गैरप्रकारांची सखोल चौकशी व सर्व शिक्षकांची बदली करण्याची मागणी गटशिक्षणाधिकारी एस. जी. निर्मळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. शाळेच्या पटसंख्येनुसार एक शिक्षक अतिरिक्त ठरत असल्याचे सांगत एका शिक्षकाची बदली करण्याची तयारी निर्मळ यांनी दर्शविली होती. तथापि, सर्व शिक्षकांच्या बदलीवर ग्रामस्थ ठाम राहिले होते. शिक्षकांच्या बदलीबाबत वरिष्ठांकडे अहवाल पाठविण्याचे लेखी आश्वासन निर्मळ यांनी ग्रामस्थांच्या शिष्टमंडळास दिल्यानंतरच ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले होते. त्यानुसार निर्मळ यांनी नाशिक जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे सर्व शिक्षकांच्या बदलीसाठी अहवाल पाठविला आहे. (वार्ताहर)