पाणी चोरांवर गुन्हे दाखल करा

By Admin | Updated: June 30, 2016 00:53 IST2016-06-29T22:43:50+5:302016-06-30T00:53:45+5:30

मिलिंद शंभरकर : नांदगावी पाणीप्रश्नी बैठक; नगरसेवक आक्रमक

Submit crime against water thieves | पाणी चोरांवर गुन्हे दाखल करा

पाणी चोरांवर गुन्हे दाखल करा

नांदगाव : पाणी गळती रोखण्यासाठी योग्य ते प्रयत्न करावेत तसेच पाणी नियोजनाचे सुधारित वेळापत्रक तयार करण्याचे आदेश देत कोणी पाणी चोरी करत असल्यास त्यांच्यावर तातडीने कारवाई करून गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी अधिकाऱ्यांना दिले.
नांदगाव शहराच्या पाणीप्रश्नाबाबत जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष विजयश्री चुंभळे यांच्या दालनात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाच्या बैठकीत शंभरकर बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार, नगराध्यक्ष शैला गायकवाड, ग्रामीण पाणीपुरवठा अधिकारी प्रकाश नंदनवरे, नांदगाव नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही.बी. दातीर, उपकार्यकारी अधिकारी प्रकाश बोरसे, अभियंता व्ही.एन. पाटील, नांदगावचे पाणीपुरवठा अधिकारी विश्वास अहिरे व नांदगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.
नांदगाव शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी गिरणा धरणातून पाणी उपसा करणारे व्ही.टी.पंप नादुरुस्त झालेले असून, सध्या फक्त एका पंपाव्दारेच पाणी उपसा केला जात आहे. त्यामुळे पाणीटंचाईस सामोरे जावे लागत आहे.
गिरणा धरणात पाणी उपसा करण्यासाठी नवीन व्ही.टी.पंप व १८० हॉर्स पॉवरच्या मोटारीसाठी सुमारे २८ लक्ष इतका खर्च अपेक्षित असून, यापैकी सुमारे १० लक्ष इतकी रक्कम देण्यास नांदगाव नगरपालिका तयार असल्याचे नगराध्यक्ष शैला गायकवाड यांनी सांगितले. तसेच नांदगाव शहरातील पाणीपुरवठा योजनेत सुधारणा होण्यासाठी तेराव्या वित्त आयोगातून गुरुकृपानगर येथील नवीन पाइपलाइन टाकण्याच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता द्यावी, अशी मागणीदेखील नगराध्यक्ष शैला गायकवाड यांनी यावेळी केली. प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजनेतून नांदगाव शहरास किमान पाच दिवसांनी पाणीपुरवठा करावा तसेच आगामी रमजान ईद सणासाठी जास्तीचा पाणीपुरवठा करावा, अशी मागणी तालुकाध्यक्ष संतोष गुप्ता यांनी यावेळी बोलताना केली.
यावेळी ग्रामीण पाणीपुरवठा अधिकारी प्रकाश नंदनवरे, नगराध्यक्ष शैला गायकवाड, तालुकाध्यक्ष संतोष गुप्ता, साहेबराव पाटील, शहराध्यक्ष
अरुण पाटील, नगरसेवक बाळकाका कलंत्री, इकबाल शेख, शिवाजी पाटील, नगरसेविका इंदिरा बनकर, सीमा राजुळे, इंदूबाई जाधव, मंगला काकळीज, विश्वास अहिरे, नांदगाव नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही.बी. दातीर, उपकार्यकारी अधिकारी प्रकाश बोरसे, अभियंता व्ही.एन. पाटील, विनोद शेलार, सुरेश गायकवाड, अशोक गायकवाड, महेंद्र गायकवाड, सचिन देवकाते, राजू लाठे आदिंनी चर्चेत सहभाग घेतला. (वार्ताहर)

Web Title: Submit crime against water thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.