समाज माध्यमांच्या आधीन
By Admin | Updated: October 11, 2015 00:07 IST2015-10-11T00:07:24+5:302015-10-11T00:07:40+5:30
दिनकर गांगल : ज्ञानाचा उत्सव उपक्रम

समाज माध्यमांच्या आधीन
नाशिक : वडीलधारी मंडळी आणि तरुण पिढी यांच्यामध्ये दिवसेंदिवस दरी वाढत चालली आहे. सुसंवाद खुंटत असून, माध्यमांच्या आवेगामुळे समाज त्यांच्या आधीन होत आहे, असे प्रतिपादन दिनकर गांगल यांनी केले.
ज्योती स्टोअर्स व शंकराचार्य सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ज्ञानाचा उत्सव लेखक तुमच्या भेटीला या व्याखानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. गंगापूररोडवरील शंकराचार्य न्यास संकुलात शनिवारी (दि.१०) तिसरे पुष्प गांगल यांनी ‘माध्यमांचा गलबला आणि संस्कृतीचा कळवळा’ विषयावर गुंफले. यावेळी ते म्हणाले, मेंदूची गती माध्यमांच्या आवेगामुळे कमी होत चालली आहे. आजची भावी पिढी जेव्हा तरुण होईल, तेव्हा त्यांच्या मनातील सांस्कृतिक चित्र कसे असेल, याची कल्पना करणे अवघड आहे. दुष्काळाला कंटाळून महाराष्ट्रात विदर्भामध्ये शेतकरी आत्महत्त्या करीत आहेत. याचे मुख्य कारण मनाची दुर्बलता आहे, हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. माध्यमांच्या वाढलेला आवेग आणि विस्कळीत होत असलेली कुटुंबव्यवस्था याचा परिणाम सामाजिक बांधिलकीवरही होताना दिसून येतो. भारतीय समाज सध्या एखाद्या अंधकारमय बोगद्याकडे जात आहे, या समाजाला प्रकाशाचा किरण कधी दिसेल हे सांगता येत नाही.आजचे युग हे माध्यमांचे युग आहे असे बोलले जात असले तरी, समाजाने आपली सद्विवेकबुद्धी जागरूक ठेवून मनाची शक्ती ओळखण्याची गरज आहे. प्रसारमाध्यमे कोणती स्वीकारायची अन् कोणती नाही, हे नागरिकांनीच ठरवायचे आहे, असेही गांगल यांनी यावेळी सांगितले.