विषय समित्यांच्या बैठका राहिल्या कागदावरच
By Admin | Updated: January 14, 2016 00:35 IST2016-01-14T00:23:57+5:302016-01-14T00:35:42+5:30
केवळ स्वाक्षरीपुरतीच सदस्यांची उपस्थिती

विषय समित्यांच्या बैठका राहिल्या कागदावरच
नाशिक : जिल्हा परिषदेत सुरू असलेला अविश्वास ठराव मोहिमेच्या पार्श्वभूमीवर बोलावण्यात आलेल्या बहुतांश विषय समितीच्या मासिक बैठका बुधवारी (दि. १३) कागदावरच राहिल्याचे चित्र होते. कृषी व पशुसंवर्धन समिती वगळता अन्य विषय समित्यांच्या बैठका केवळ कागदोपत्री झाल्याचे दाखविण्यात आले.
काही विषय समित्यांच्या बैठका तर पुरेशा गणपूर्तीअभावी तहकूब करण्याची नामुष्की संबंधित सभापतींवर आल्याचे समजते. मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्यासाठी स्वाक्षरी मोहिमेस सुरुवात झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर काल बुधवारी बहुतांश विषय समित्यांच्या मासिक बैठकांचे आयोजन करण्यात आले
होते.
प्रत्यक्षात कृषी व पशुसंवर्धन तसेच अर्थ समिती वगळता अन्य विषय समित्यांच्या बैठकाच झाल्या नसल्याचे कळते. तसेच अर्थ समिती सभापती तथा उपाध्यक्ष प्रकाश वडजे बैठकीस नसल्याने सदस्य विलास माळी हे प्रभारी सभापती होऊन त्यांनीही अर्थ समितीची बैठक काही मिनिटांत आटोपती
घेतली. अन्य विषय समित्यांचे सदस्यच हजर नसल्याने चार ते पाच विषय समित्यांच्या सभा गणपूर्तीअभावी तहकूब करण्यात आल्याचे चित्र होते. विषय समित्यांच्या बैठकाच रद्द करण्यात आल्याने स्वाक्षरी मोहीमही तूर्तास स्थगित करण्यात आल्याचे बोलले जात आहे. (प्रतिनिधी)