हरसूल, पेठ, त्र्यंबकेश्वरला उपबाजार
By Admin | Updated: August 2, 2015 00:20 IST2015-08-02T00:18:30+5:302015-08-02T00:20:22+5:30
आभार दौरा : ‘आपलं पॅनल’ची ग्वाही

हरसूल, पेठ, त्र्यंबकेश्वरला उपबाजार
नाशिक : समाजात काम करत असताना कुठेही दादागिरी चालत नाही. त्यासाठी समाजाची जाण असणे महत्त्वाचे असते. त्यामुळेच नुकत्याच झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत सभासद व शेतकऱ्यांनी ‘आपलं पॅनल’ला बहुमत दिले. आता निवडणुकीत दिलेल्या आश्वासनानुसार गिरणारे, त्र्यंबकेश्वर, हरसूल व पेठ येथे बाजार समितीचे उपबाजार उभारणार असल्याची ग्वाही नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत निवडून आलेले संचालक माजी खासदार देवीदास पिंगळे यांनी दिली.
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत देवीदास पिंगळे यांच्या आपलं पॅनलला बहुमत मिळाले. त्यामुळे मतदार व शेतकऱ्यांचे आभार मानण्यासाठी आपलं पॅनलच्या वतीने गिरणारे व त्र्यंबकेश्वर येथे आभार दौरा व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना देवीदास पिंगळे यांनी निवडणुकीत दिलेल्या जाहीरनाम्यानुसारच आपलं पॅनलची पुढे वाटचाल सुरू राहणार असल्याचे जाहीर केले. पिंगळे म्हणाले, बाजार समितीत चार एकर जागेवर शीतगृह उभारून तेथे शेतकऱ्यांच्या मालाची नाममात्र शुल्क आकारून साठवणूक करण्याचा आपला मानस आहे.
आभार दौऱ्याप्रसंगी संचालक दिलीप थेटे, तुकाराम पेखळे, संजय तुंगार, युवराज कोठुळे, भाऊसाहेब खांडबहाले, रवींद्र भोये, विमल जुंद्रे तसेच डॉ. दिनेश जोशी, आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)